scorecardresearch

Premium

विश्लेषण : चेन्नईच्या ‘आयपीएल’ मधील सातत्यपूर्ण कामगिरीचे गमक काय?

कुशल रणनीतीकार अशी ओळख असलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आपले पाचवे ’आयपीएल’ जेतेपद पटकावले. चेन्नईच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे गमक काय?

CSK Win IPL Again
चेन्नईच्या सातत्यपूर्ण कामगिरीमागचं गुपित काय?

संदीप कदम

कुशल रणनीतीकार अशी ओळख असलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आपले पाचवे ’आयपीएल’ जेतेपद पटकावले. चेन्नईच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे गमक काय, कोणत्याही खेळाडूने संघाच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली, तसेच त्यांच्यासाठी हे जेतेपद वैशिष्ट्यपूर्ण का आहे, याचा घेतलेला हा आढावा…

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

चेन्नईसाठी हे जेतेपद वैशिष्ट्यपूर्ण का?

महेंद्रसिंह धोनी या भारताच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार समजला जातो. त्याने भारतासाठी एकदिवसीय विश्वचषक, ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि ‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेची जेतेपदे मिळवून दिली आहेत. त्याच्याच कारकीर्दीत भारताच्या कसोटी संघाने अग्रस्थान मिळवले. ‘आयपीएल’च्या या हंगामातही जेतेपद मिळवण्यासोबत धोनीने ‘आयपीएल’मध्ये पाच जेतेपद मिळवण्याच्या रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी साधून त्याने चेन्नईने यापूर्वी, २०१०, २०११, २०१८ आणि २०२१मध्ये जेतेपद मिळवली आहे. तसेच, यंदा धोनीची फलंदाजी फारशी चांगली झाली नसली. तरीही, कर्णधार म्हणून त्याने स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्यामुळे चेन्नईसाठी यावेळचे जेतेपद वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे लागेल. तसेच, चेन्नईचा संघ ज्या स्टेडियमवर खेळत होता. तेथे संघाला विशेषकरून धोनीला पाठिंबा देण्यासाठी अनेक चाहते उपस्थित असायचे.

अंतिम सामन्यात रवींद्र जडेजा कसा ठरला निर्णायक?

पावसाच्या व्यत्ययानंतर सोमवारी खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यातही पावसाचा अडथळा आला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने ४ बाद २१४ धावसंख्या उभारली. त्यानंतर डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीनुसार चेन्नई सुपर किंग्जसमोर विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य देण्यात आले. सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे (४७) व ऋतुराज गायकवाड (२६) यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. यानंतर अजिंक्य रहाणेनेही (२७) चांगले फटके मारले. रहाणे बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या अंबाती रायूडुने आक्रमक १९ धावा करत संघाला विजयासमीप नेले. त्यानंतर सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आणि चेन्नईला अखेरच्या दोन चेंडूंत १० धावांची आवश्यकता होती. फलंदाजीस आलेल्या अष्टपैलू रवींद्र जडेजावर धावा करण्यासाठी दबाव होता. अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर जडेजाने षटकार मारला. आता संघाला अखेरच्या चेंडूवर चार धावांची आवश्यकता होती. जडेजाने चौकार मारत संघाला पाचवे ’आयपीएल’ विजेतेपद मिळवून दिले. जडेजाने या हंगामात संघासाठी १९० धावांचे योगदान दिले आणि गोलंदाजीत २० गडी बाद करताना निर्णायक भूमिका पार पाडली. धोनीच्या विश्वासू खेळाडूंमध्ये जडेजाचा समावेश होतो. चेन्नई संघासोबत आल्यानंतर त्याचा खेळ आणखी बहरला.

चेन्नईच्या फलंदाजांनी हंगामात कशी दाखवली चमक?

ऋतुराज गायकवाड व डेव्हॉन कॉन्वे यांनी संघाच्या जेतेपदाच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका पार पाडली. अनेक सामन्यांमध्ये दोघांनीही संघाला चांगली सुरुवात देत मजबूत पाया तयार केला. कॉन्वेने हंगामातील १६ सामन्यांत ६७२ धावा केल्या. त्याने यादरम्यान ६ अर्धशतक झळकावले. तो यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजी यादीत शुभम गिल, फॅफ ड्यूप्लेसिसनंतर तिसऱ्या स्थानी आहे. ऋतुराजने १६ सामन्यांत ५९० धावा करत कॉन्वेला चांगली साथ दिली. या हंगामात मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणेचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्याने १४ सामन्यांत ३२६ धावा केल्या. यामध्ये त्याने दोन अर्धशतकी खेळी केल्या. त्याने यावेळी आक्रमक खेळ करताना सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या या कामगिरीमुळेच पुन्हा एकदा भारताच्या कसोटी संघात त्याला स्थान मिळले. अन्य मुंबईकर फलंदाज शिवम दुबेसाठीही हा हंगाम विशेष संस्मरणीय राहिला. त्याने हंगामात ४१८ धावा करताना मध्यक्रमात संघाच्या धावसंख्येत भर घालण्याची निर्णायक भूमिका पार पाडली.

तुषार देशपांडे, महीश पथिराना या युवा गोलंदाजांची लक्षवेधक कामगिरी…

चेन्नईचा संघ नेहमीच अनुभवी खेळाडूंवर अधिक विश्वास ठेवतो. मात्र, यंदाच्या हंगामात मुंबईकर तुषार देशपांडे आणि श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज महीश पथिराना यांनी वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळली. यावेळी देशपांडे संघासाठी सर्वाधिक २१ बळी मिळवले. त्यानंतर पथिरानाने १९ बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली. देशपांडे अजून भारताकडून खेळला नसला तरीही, स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणारा हा गोलंदाज संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. दुसरीकडे, पथिराना हा त्याचा आदर्श असलेल्या दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाप्रमाणे गोलंदाजी करतो. दोघांनीही निर्णायक क्षणी गडी बाद करताना महत्त्वपूर्ण कामगिरी केली. प्रतिस्पर्धी संघाच्या अनेक फलंदाजांना त्याने अडचणीत आणले. दोन्ही गोलंदाजांनी अनेकदा महागडी षटके टाकली. मात्र, कर्णधार धोनीने त्यांच्यावरील विश्वास कायम ठेवला आणि त्यांना संधी दिली. अनुभवी दीपक चहरनेही १३ बळी मिळताना संघाच्या जेतेपदात आपले योगदान दिले. जडेजाने फिरकी गोलंदाजीची आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. त्याला श्रीलंकेचा आणखी एक युवा फिरकीपटू महीश थिकसानाने (११ बळी) चांगली साथ दिली. यावेळच्या हंगामात चेन्नईमध्ये युवा व अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण पहायला मिळाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is the secret behind chennai consistent performance in ipl print exp scj

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×