Salman Khan First Experienced Trigeminal Neuralgia : अभिनेता सलमान खानने काही वर्षे ‘ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया’ नावाच्या गंभीर आजाराचा सामना केला. या आजारामुळे चेहऱ्यापासून मेंदूकडे जाणाऱ्या नसांपैकी एक नस दाबली किंवा बिघडली गेल्याने तीव्र वेदना होतात. अलीकडेच सलमानने त्याची एकेकाळची सहकलाकार काजोल आणि ट्विंकल खन्ना यांनी होस्ट केलेल्या टॉक शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने या आजारामुळे होणाऱ्या तीव्र वेदनांबद्दल व्यथा मांडली. ट्रायजेमिनल न्यूरॉल्जियाच्या असह्य वेदनांमुळे त्याचे दुसरे नाव चक्क ‘सुसाईड डिसीज्’ असेच ठेवण्यात आले आहे. नेमका काय आहे हा आजार? त्याची लागण कशामुळे होते? सलमान खानने त्याच्या आजाराबद्दल काय सांगितले? त्यासंदर्भातील हा आढावा…

आजाराबद्दल सलमान खान काय म्हणाला?

‘ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया’ या आजाराला ‘सुसाइडल डिसीज’ असेही म्हटले जाते, कारण त्यामुळे होणाऱ्या वेदना व्यक्तीला अक्षरशः हताश आणि निराशेकडे घेऊन जातात. आपल्या वेदनांबद्दल बोलताना सलमान म्हणाला, “हा एक असा आजार आहे, त्याची लागण झाल्यानंतर तुम्हाला त्याच्याबरोबरच जगावे लागते. २००७ मध्ये मला पहिल्यांदा या आजाराचा त्रास जाणवला होता. त्यावेळी ‘पार्टनर’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते आणि अभिनेत्री लारा दत्ता माझ्याबरोबर होती. तिने माझ्या चेहऱ्यावर आलेला एक केस ओढल्याने त्याच क्षणी मला तीव्र वेदना जाणवल्या आणि तिथूनच या आजाराची सुरुवात झाली.”

हा आजार साडेसात वर्षे सहन करण्याबद्दल खान म्हणाला, “मला दर ४-५ मिनिटांनी अचानक वेदना व्हायच्या. त्याची तीव्रता इतकी असायची की मला नाश्ता करायलाही दीड-दोन तास लागायचा. साधे ऑम्लेट खायचे असले तरी ते चावता यायचे नाही. स्वतःला त्रास देत आणि वेदना सहन करीत जेवण करावे लागायचे. असा आजार शत्रूलाही होऊ नये. या नसेवरील दाब कमी करण्यासाठी मी २०११ मध्ये शस्त्रक्रियादेखील करून घेतली.” दरम्यान, ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया आजाराची लागण झालेल्या व्यक्तीला दात घासताना किंवा मेकअप करताना अगदी हलक्या स्पर्शाने चेहऱ्यावर विजेचा झटका बसल्यासारखी वेदना होऊ शकते, असे मत गुरुग्राम येथील ‘Marengo Asia International Institute of Neuro & Spine’ रुग्णालयाचे चेअरमन प्रवीण गुप्ता यांनी व्यक्त केले.

आणखी वाचा : Pakistan vs Bangladesh : बांगलादेश पाकिस्तान विरुद्ध का हरला? ५ कारणे…

ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया म्हणजे नेमके काय?

ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया हा चेहऱ्यापासून मेंदूकडे जाणाऱ्या नसांमध्ये होणारा एक दुर्धर आजार आहे. साधारणत: या नसांचे तीन भाग असतात. त्यातील पहिला भाग डोळे व कपाळ व्यापतो; तर दुसरा भाग तोंडातील वरच्या जबड्याचा भाग व्यापतो. त्याशिवाय तिसरा भाग खालच्या जबड्याचा खालचा भाग व्यापतो. या तीनपैकी कोणत्याही भागात बिघाड झाला तर रुग्णाला चेहऱ्यावरून डोक्यापर्यंत विजेच्या झटक्यासारखी तीव्र वेदना जाणवते. बोलणे, खाणे-पिणे किंवा चेहऱ्याला स्पर्श होणे यामुळे ही वेदना आणखी वाढते. चेहऱ्याच्या भागात वेदना असल्याने अनेक रुग्णांना ही समस्या दातांशी संबंधित असल्याचा गैरसमज होतो आणि ते दंतचिकित्सकांकडे जातात. हा आजार महिलांमध्ये आणि ५० वर्षांवरील व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात दिसतो. मात्र, योग्य उपचाराद्वारे त्याचे निदान करता येते.

ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया नेमका कशामुळे होतो?

ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया होण्याची काही सामान्य कारणे आहेत. धमनी किंवा शिरांचा दाब चुकून नसांवर पडल्यास या आजाराची लागण होऊ शकते. कधीकधी रक्तामध्ये तयार झालेल्या गुठळ्यांमुळे हा आजार उद्भवू शकतो. मल्टिपल स्क्लेरोसिस या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्येही या आजाराची समस्या जाणवते. त्याशिवाय चेहऱ्यावर झालेली जखम, स्ट्रोक किंवा सदोष दंत शस्त्रक्रिया ही कारणेदेखील ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया आजाराला निमंत्रण देऊ शकतात.

हेही वाचा : स्वयंघोषित बाबाचे यापूर्वीही अनेक कारनामे, कोण आहे चैतन्यानंद सरस्वती? त्याला २००९ मध्येही अटक का झाली होती?

ट्रायजेमिनल न्यूरॉल्जियावर काय उपचार आहे?

ट्रायजेमिनल न्यूरॉल्जियाचे निदान झाल्यावर या विकाराच्या उपचारासाठी रुग्णाला काही औषधे दिली जातात. ही औषधे ट्रायजेमिनल नसेचे कार्य सुधारतात आणि रुग्णाला दीर्घकालीन आराम देतात. यापैकी बहुतेक औषधे ‘सोडियम चॅनेल ब्लॉकर्स’ची असल्याने ती नसांमधील सोडियम आयन्सचा प्रवाह थांबवतात. याशिवाय आजारावर उपाय म्हणून न्यूरोमायक्रोस्कोपच्या साहाय्याने ‘मायक्रोव्हॅस्क्युलर डीकॉम्प्रेशन’ ही शस्त्रक्रिया केली जाते. यात दाब आलेली रक्तवाहिनी नसेपासून दूर केली जाते. ही रक्तवाहिनी तशीच दूर राहावी म्हणून त्या दोघांच्यामध्ये ‘टेफ्लॉन’ या पदार्थाचा स्पंज घालून ठेवला जातो. हा स्पंज कधीही विरघळत नाही. सहसा आपली जागाही सोडत नाही. ‘ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया एमव्हीडी शस्त्रक्रियेने बरा होतो हे सहा-सात वर्षांपूर्वी कळले असते, तर आयुष्यातली बहुमूल्य वर्षे वाया गेली नसती’, अशीच या आजाराच्या बहुसंख्य रुग्णांची प्रतिक्रिया असते.

सलमान खानने आजारावर उपचार कसा घेतला?

सलमानने सांगितले की, ट्रायजेमिनल न्यूराल्जियामुळे होत असलेल्या वेदनांना कमी करण्यासाठी तो दररोज ७५० मिलीग्राम पेनकिलर घेत होता; पण त्याचाही काहीही उपयोग झाला नाही. वेदना वाढतच गेल्याने सलमानने डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि गॅमा नाईफ शस्त्रक्रिया केली आहे. ही शस्त्रक्रिया तब्बल ८ तासांची होती. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्याला सांगितले की, २० ते ३० टक्के वेदना कमी होतील; पण आता या वेदना पूर्णपणे नाहीशा झाल्याचे सलमानने सांगितले आहे. आता मला ट्रायजेमिनल न्यूराल्जियाचा काही त्रास नाही, असे त्याने चॅट शोमध्ये सांगितले.