Buddha Purnima and Karl Marx birth anniversary : आज बुद्ध पौर्णिमा आणि योगायोगाने महान विचारवंत कार्ल मार्क्स यांचीही जयंती आहे. दोन्ही महापुरुषांचे तत्त्वज्ञान जगभरातील लोकांनी डोक्यावर घेतले. गौतम बुद्ध यांनी धार्मिक तत्त्वज्ञानातून जीवन जगण्याचा मार्ग दाखवून दिला. तर कार्ल मार्क्सने एक नवी राज्यव्यवस्था आणि अर्थशास्त्रीय पद्धतीचा साम्यवादी विचार दिला. भारतात आजवर बुद्ध की कार्ल मार्क्स यावर विपुल चर्चा झडलेली आहे. दोन्ही बाजूचे समर्थक आपापल्या पद्धतीने दोघांच्याही तत्त्वज्ञानाचा अन्वयार्थ काढण्याचा प्रयत्न करतात. बुद्धिझम मानणारे आणि मार्क्सवादी आपापल्या सोयीचे मुद्दे रेटताना दिसतात. दोहोंमधील तुलना आणि साम्य जाणून घ्यायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय दुसरी योग्य व्यक्ती कुणीही असू शकत नाही. बाबासाहेबांनी २९ नोव्हेंबर १९५६ रोजी काठमांडू (नेपाळ) येथील वर्ल्ड बुद्धिस्ट परिषदेत ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या विषयावर ऐतिहासिक असे भाषण दिले. या भाषणाचे पुस्तकरूपात अनेक भाषांमध्ये आजवर भाषांतर झालेले आहे. बुद्ध आणि मार्क्सचे अनुयायी या भाषणाचा आधार घेऊन त्यांना अपेक्षित असलेला अर्थ काढतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच “कार्ल मार्क्स आणि बुद्ध यांची तुलना विनोदी म्हणून मानली जाईल. त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही,” असे स्पष्ट केले आहे. बुद्ध व मार्क्स यांच्यात २३८१ वर्षांचे अंतर आहे. बुद्ध इ.स. पूर्व ५६३ मध्ये जन्माला आले, तर कार्ल मार्क्स यांचा जन्म १८१८ साली झाला. बुद्ध आणि कार्ल मार्क्स या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा सिद्धांत, कार्ल मार्क्सचा सिद्धांत, दोघांच्याही विचारांमधील तुलना, दोघांचीही साधने आणि त्याचे मूल्यमापन, साधनांची परिणामकारिकता आणि टिकाऊपणा दाखवून देण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे. हे करीत असताना त्यांनी मार्क्सवाद्यांनी पूर्वग्रह बाजूला ठेवून बुद्धाचा अभ्यास करण्याचे आणि बुद्धाची भूमिका समजून घेण्याचे आवाहन त्या काळात मार्क्सवाद्यांना केले होते. या लेखात “बुद्ध आणि कार्ल मार्क्स” या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणातील मुद्दे घेऊन हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

kiren rijiju controversial remarks on rahul gandhi
राहुल गांधींसारखे विरोधी पक्षनेते देशाला शाप! संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांची टीका
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
ncp sharad pawar peace walk in mumbai
मंत्रालयासमोर ‘राष्ट्रवादी’ची शांतता पदयात्रा
kedar Dighe on Anand Dighe
Anand Dighe Death Case : “आनंद दिघेंचा घात झालाय”, शिरसाटांच्या विधानावर केदार दिघेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी तयारी आहे की…”
Prakash Ambedkar criticism of Jarange Patil over the election
जरांगेंनी निवडणूक लढवली नाही, तर ते पवारांच्या इशाऱ्यावरील हे स्पष्ट; ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र
‘वंचित’च्या निदर्शनांची दिशा काय?
Babasaheb Ambedkar, Shyam Manav,
आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक पुत्र आणि ते…
Sharad Pawar statement that Sitaram Yechury contribution is important in the stability of the United Progressive Alliance government
‘संपुआ’ सरकारच्या स्थिरतेत येचुरींचे योगदान महत्त्वाचे; शरद पवार यांच्याकडून आठवणींना उजाळा

हे वाचा >> Buddha Purnima 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? जाणून घ्या…

बुद्ध आणि मार्क्स तत्त्वज्ञानातील समानता

बुद्धाचे तत्त्वज्ञान समजावून सांगण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात अतिशय सोप्या भाषेत आणि मुद्देसूद २५ मुद्दे मांडले आहेत. त्रिपिटकाच्या वाचनातून जी तत्त्वे समजली ती बाबासाहेबांनी उद्धृत केली. “स्वतंत्र समाजासाठी धर्म आवश्यक आहे, प्रत्येक धर्म स्वीकारण्यासारखा असतोच असे नाही, ईश्वराला धर्माचा केंद्रबिंदू मानणे अयोग्य आहे, सर्व मानव समान आहेत, कोणतीही गोष्ट अंतिम नाही..” असे २५ मुद्दे त्यांनी भाषणात सांगून बुद्धाचे तत्त्वज्ञान सांगितले.

कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानाबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, मार्क्स आधुनिक समाजवादाचा अथवा साम्यवादाचा जनक आहे यात शंका नाही. समाजवादाचा सिद्धांत सांगण्यात मार्क्सला रस नव्हता. त्याला त्याचा समाजवाद वैज्ञानिक होता, हे सिद्ध करण्यात अधिक स्वारस्य होते. आपला समाजवादाचा प्रकार हा वैज्ञानिक असून स्वप्नरंजित नाही, हे आपले म्हणणे प्रस्थापित करणे, यात मार्क्सला स्वारस्य होते. मार्क्सच्या विचारसरणीनुसार, तत्त्वज्ञानाचा हेतू विश्वाचे उगमस्थान काय याचे स्पष्टीकरण करणे नसून विश्वाचे पुनर्निर्माण करणे, हा आहे. आर्थिक शक्ती हीच मुख्यतः इतिहास घडविण्यात जबाबदार असते. समाजात मालक आणि कामगार या दोन वर्गांमध्ये नेहमीच वर्गकलह सुरू असतो. कामगार हे मालकांपेक्षा संख्येने जास्त असल्यामुळे ते राज्यसत्ता हस्तगत करतील व स्वतःचे राज्य प्रस्थापित करतील, हे अटळ आहे. (यालाच मार्क्सने कामगारवर्गाची हुकूमशाही म्हटले)

बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यामधील तुलना

बुद्ध आणि मार्क्स यांच्या विचारसरणीतील जे समान अवशेष आहेत. असे चार मुद्दे आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले आहेत. “तत्त्वज्ञानाचे कार्य जगाची पुनर्रचना करणे आहे. विश्वाच्या उगमस्थानाचे स्पष्टीकरण करण्यात वेळ नष्ट करणे नव्हे,” या पहिल्या मुद्द्यावर बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यामध्ये पूर्ण एकमत असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात. दुसरा मुद्दा, वर्गावर्गांमध्ये हितसंबंधांचा कलह आहे. तिसरा मुद्दा, संपत्तीच्या खासगी मालकीमुळे एका वर्गाला सत्ता मिळते तर दुसऱ्या वर्गाला त्याची पिळवणूक झाल्यामुळे दुःख मिळते. चौथा मुद्दा म्हणजे, समाजाच्या भल्यासाठी खासगी संपत्ती नष्ट करून हे दुःख दूर करणे आवश्यक आहे. या चारही मुद्द्यांबाबत बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांचे एकमत असल्याचे आंबेडकर उदाहरणाद्वारे स्पष्ट करतात.

हे वाचा >> विश्लेषण: बुद्ध पौर्णिमा २०२३- बुद्धमूर्तीमुळे प्रकाशात आले पहिल्या शतकातील प्राचीन जागतिकीकरण!

बुद्ध आणि कार्ल मार्क्सची साधने

बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्या काही विचारांमध्ये साम्य असले तरी ते साध्य करण्याची साधने मात्र वेगवेगळी आहेत. बुद्धाने साम्यवाद घडवून आणण्यासाठी सांगितलेली साधने अत्यंत निश्चित अशी स्पष्ट आहेत. तीन भागांमध्ये त्याचे वर्णन करता येऊ शकते. पहिल्या भागात पंचशीलाच्या आचरणाचा समावेश होतो. दुःखाचे कारण दूर करण्यासाठी पंचशील आचरणात आणण्याचा उपदेश बुद्धांनी केला आहे. तर माणसाची माणसासोबत असलेली असमानता दूर करण्यासाठी बुद्धाने आर्य आष्टांगिक मार्ग सांगितला आहे. जगातील दु:ख व दैन्य संपुष्टात आणण्यासाठी बुद्धाने त्यासंबंधीची फलश्रुती म्हणून अधिकारवाणीने प्रतिपादन केलेला हा धम्मोपदेश आहे.

साम्यवाद्यांनी स्वीकारलेली साधने तितकीच स्पष्ट, अपुरी आणि झटपट अमलात येणारी आहेत. ती म्हणजे १. हिंसा आणि २. कामगारांची हुकूमशाही. साम्यवाद प्रस्थापित करण्याची केवळ हीच दोन साधने आहेत, असे साम्यवादी म्हणतात. पहिले साधन हिंसा आहे.

बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांचे ध्येय समान आहे. त्यांच्यातील भेद हा साधनाबाबत आहे, ही महत्त्वाची बाब येथे अधोरेखित करायला हवी.

साधनांचे मूल्यमापन

बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्या साधनांचे मूल्यमापन करीत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुणाची साधने दीर्घकाळ टिकून राहतील, याकडे लक्ष वेधतात. तसेच दोन्ही बाजूस काही गैरसमज आहेत, ते काढून टाकण्याची आवश्यकता असल्याचेही सांगतात. त्यांनी पहिला मुद्दा हिंसेचा घेतला. बुद्ध हिंसेच्या विरुद्ध होता परंतु तो न्यायाच्याही बाजूने होता. जेथे न्यायासाठी आवश्यक असेल तेथे त्याने बळाचा वापर करण्यास परवानगी दिली होती, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. यासाठी त्यांनी वैशालीचा मुख्य सिंह सेनापती आणि बुद्ध यांच्यात झालेल्या संवादाचे उदाहरण दिले. बुद्ध म्हणाले की, अपराध्याला शिक्षा झालीच पाहिजे. तसेच निरपराधी माणसाची सुटकादेखील झाली पाहिजे. न्यायाधीशाने जर गुन्हेगाराला शिक्षा तर तो न्यायाधीशाचा गुन्हा ठरत नाही. जेव्हा शांतता राखण्याचे सर्व उपाय अयशस्वी ठरतात तेव्हा होणाऱ्या हिंसेची जबाबदारी जो युद्ध सुरू करतो त्याच्यावर येऊन पडते. युद्ध असू शकेल, पण ते स्वार्थी हेतूंसाठी असता कामा नये.

बुद्धांची अहिंसा ही जैन धर्माचा संस्थापक महावीर यांनी उपदेशिलेल्या अहिंसेसारखी टोकाची नव्हती. बुद्धाने फक्त ऊर्जा म्हणून करण्यात येणाऱ्या बळाच्या वापराला परवानगी दिली असती. अहिंसा हे अनिर्बंध तत्त्व आहे, असा प्रचार साम्यवादी करतात. बुद्धाचा त्यास सक्त विरोध होता.

हे ही वाचा >> विश्लेषण: बुद्ध पौर्णिमा २०२३- भारतात सर्वाधिक बौद्ध लेणी का आढळतात?

दुसरा मुद्दा हुकूमशाहीचा. बुद्धाला कसलीच हुकूमशाही मान्य झाली नसती. तो प्रजासत्ताकवादी म्हणून जन्माला आला आणि प्रजासत्ताकवादी म्हणूनच पावला, असा उल्लेख बाबासाहेबांनी केला आहे. या वेळी त्यांनी बुद्धाचे आणि शाक्य प्रजासत्ताक वैशालीचे नाते उलगडून सांगितले आहे. भिक्षुसंघाची रचना अत्यंत समतावादी होती. बुद्ध स्वतः केवळ भिक्षूंपैकी एक होता. संघावर नियंत्रण ठेवण्यासाठी संघाचा प्रमुख म्हणून कोणाला तरी नेमावे, अशी त्याच्या मृत्यूपूर्वी त्याला दोनदा विनंती करण्यात आली होती. परंतु त्याने हुकूमशहा होण्यास नकार दिला व हुकूमशहा नेमण्यासही नकार दिला.

हुकूमशाही की लोकशाही

साम्यवादाच्या हुकूमशाहीबद्दल बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की, हुकूमशाही अल्प कालावधीसाठी चांगली असेलही आणि लोकशाही सुरक्षित बनविण्यासाठीही ती स्वागतार्ह गोष्ट असेलही. पण हुकूमशाहीने तिचे कार्य केल्यावर लोकशाहीच्या मार्गातील सर्व अडथळे व दगडधोंडे दूर केल्यानंतर व लोकशाहीचा मार्ग सुरक्षित बनविल्यानंतर, तिने स्वतः संपुष्टात का येऊ नये? यासाठी डॉ. आंबेडकर सम्राट अशोकाचे उदाहरण देतात. अशोकाने कलिंगविरुद्ध हिंसा केली, परंतु त्यानंतर त्याने हिंसेचा पूर्णपणे त्याग केला. आजच्या आपल्या विजेत्यांनी जर त्यांच्या केवळ बळी ठरलेल्यांनाच निःशस्त्र न करता स्वतःलाही निःशस्त्र केले असते तर सर्व जगभर शांतता प्रस्थापित झाली असती. साम्यवाद्यांनी याबद्दल कोणतेही उत्तर दिलेले नाही. तसेच

तसेच बळाशिवाय साम्यवादी राज्य कायम राखता येऊ शकत नसेल आणि साम्यवाद्यांना एकत्र ठेवणारे बळ परत काढून घेतल्यावर जर त्याचे पर्यवसान अराजकात होत असेल तर साम्यवादी राज्य काय कामाचे, असा प्रश्न डॉ. आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. बळ काढून घेतल्यावर ते राज्य कायम राखू शकेल, अशी एकमेव गोष्ट म्हणजे धर्म होय. परंतु साम्यवाद्यांना धर्म वर्ज्य आहे. त्यांचा धर्माविषयीचा द्वेष इतका खोलवर रुजला आहे की, ते कोणते धर्म साम्यवादाला साहाय्यक आहेत आणि कोणते धर्म तसे नाहीत यामध्ये भेददेखील करायला तयार नाहीत. साम्यवाद्यांनी त्यांच्या ख्रिस्ती धर्माविषयीचा द्वेष बौद्ध धर्मालाही लागू केला. त्या दोहोंमधील फरक तपासून पाहण्यासाठी ते थांबले नाहीत.

साम्यवादाचा ख्रिस्ती धर्माविरुद्ध पहिला आरोप होता की, त्यांनी लोकांना परलोकांत नेले आणि इहलोकांत त्यांना गरिबी भोगायला लावली, असा आरोप बौद्ध धर्माविरुद्ध करता येऊ शकत नाही. तसेच साम्यवाद्यांनी ‘धर्म ही लोकांसाठी अफू आहे’ असे विधान केले आहे. हा आरोप बायबलमधील पर्वतावरील प्रवचनावर आधारलेला आहे. ते प्रवचन गरिबांना व दुर्बलांना स्वर्गाचे आश्वासन देते. मात्र बौद्ध धर्म असे करीत नाही, हे समजावून देण्यासाठी आंबेडकरांनी बुद्ध आणि अनातपिंडिक यांचा संवाद उद्धृत केला आहे.

आणखी वाचा >> विश्लेषण : बुद्ध पौर्णिमा २०२३ : गौतम बुद्धांच्या हस्तमुद्रा काय सूचित करतात?

रशियन लोकांना त्यांच्या साम्यवादाचा वर्ग आहे. परंतु ते एक गोष्ट विसरतात की, सर्व आश्चर्यातील आश्चर्य म्हणजे बुद्धाने संघामध्ये हुकूमशाहीशिवाय साम्यवाद प्रस्थापित केला. तो अतिशय छोट्या प्रमाणातील साम्यवाद असेलही, परंतु तो हुकूमशाहीशिवाय असलेला साम्यवाद होता. हे आश्चर्य लेनिनलासुद्धा करता आलेले नाही.

बुद्धाचा मार्ग वेगळा होता. त्याचा मार्ग माणसाचे मन बदलण्याचा, माणसाचा स्वभाव बदलण्याचा होता, जेणेकरून माणूस जे काही करतो ते तो स्वेच्छेने व बळाचा अगर जबरदस्तीचा वापर न करता करील. माणसाचा स्वभाव बदलण्याची त्याची मुख्य साधने त्याचा धम्म व त्याच्या धम्माची अखंड शिकवण ही होती. लोकांना जे करायला आवडत नाही ते त्यांना करायला लावण्यासाठी लोकांवर बळजबरी करणे हा बुद्धाचा मार्ग नव्हता. मग ती कृती त्यांच्या भल्यासाठी का असेना.

स्वातंत्र्याशिवाय समतेला अर्थ नाही

“रशियन साम्यवादी हुकूमशाहीने अर्थातच आश्चर्यकारक यश मिळवले आहे, असा दावा करण्यात येतो. हे अर्थातच नाकारू शकत नाही. म्हणूनच तर मी म्हणतो की, रशियन हुकूमशाही सर्व मागास देशांना उपयुक्त ठरेल. परंतु हा कायमच्या हुकूमशाहीसाठी युक्तिवाद नाही. मानवतेला केवळ आर्थिक मूल्यांची आवश्यकता नाही. आध्यात्मिक मूल्ये टिकवून ठेवण्याचीही तिला आवश्यकता आहे. माणसाचा भौतिक त्याचप्रमाणे आध्यात्मिक विकास झाला पाहिजे. ज्याचा सारांश फ्रेंच राज्यक्रांतीने सहभाव, स्वातंत्र्य व समता या तीन शब्दांत दिला आहे. त्या नवीन पायावर समाजाची उभारणी करण्याकडे समाज वाटचाल करीत आहे. या घोषणेमुळे फ्रेंच राज्यक्रांतीचे स्वागत झाले. परंतु समता प्रस्थापित करण्यात ती अपयशी ठरली. आम्ही रशियन क्रांतीचे स्वागत करतो. कारण समता प्रस्थापित करणे हे तिचे ध्येय आहे. परंतु तिला अवास्तव महत्त्व देता येणार नाही. सहभाव वा स्वातंत्र्य याशिवाय समतेला कसलाही अर्थ नाही. बुद्धाचा मार्ग अनुसरला तरच या तिन्ही गोष्टी एकत्र राहू शकतील असे दिसते. साम्यवाद केवळ समता ही एकच गोष्ट देऊ शकतो. समता, सहभाव व स्वातंत्र्य या गोष्टी देऊ शकत नाही,” असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या निबंधात केले आहे.