scorecardresearch

Premium

विश्लेषण : जेरुसलेममध्ये वसंत ऋतूत धार्मिक तणाव का वाढतो?

दरवर्षी वसंत ऋतू आला की तीन धर्मांसाठी पवित्र असलेल्या ऐतिहासिक जेरुसलेम शहरात तणाव वाढतो.

eligious tensions rise in Jerusalem
वाचा सविस्तर विश्लेषण

अमोल परांजपे

दरवर्षी वसंत ऋतू आला की तीन धर्मांसाठी पवित्र असलेल्या ऐतिहासिक जेरुसलेम शहरात तणाव वाढतो. मग हा तणाव इस्रायल, पॅलेस्टाईन, लेबनॉन, जॉर्डन या संपूर्ण परिसरात पसरतो. निदर्शने, दंगली, गोळीबार एवढेच नव्हे तर अगदी क्षेपणास्त्र हल्लेही होतात. गेल्या ४-५ वर्षांपासून सातत्याने हे प्रकार घडत आहेत. यंदाचा वसंत ऋतू त्याला अपवाद ठरलेला नाही.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

मुस्लीम, यहुदी आणि ख्रिस्तींसाठी जेरुसलेम पवित्र का?

मक्का आणि मदिना या शहरांनंतर मुस्लिमांसाठी जेरुसलेम हे तिसऱ्या क्रमांकाचे पवित्र शहर आहे. येथेच अल अक्सा ही प्रसिद्ध मशीद, सोनेरी घुमट आदी ऐतिहासिक वास्तू आहेत. अल अस्का मशिदीच्या परिसरातील हा सोनेरी घुमट असलेले ‘टेम्पल माऊण्ट’ यहुदी (ज्यू) धर्माच्या केंद्रस्थानी आहे. जेरुसलेममधील यहुदी या देवळाकडे तोंड करून प्रार्थना करतात. याखेरीज यहुदी बायबलमध्ये उल्लेख असलेली अनेक प्रसिद्ध देवळे शहरात आहेत. रोमन राज्यकर्त्यांनी नष्ट केलेल्या ‘सेकंड टेम्पल’ची पश्चिमेकडील भिंत यहुदींसाठी पवित्र आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ख्रिस्ती धर्मीयांसाठीही जेरुसलेम पवित्र आहे. येशू ख्रिस्तांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे प्रसंग याच मातीत घडले आहेत. त्यांना येथेच सुळावर चढविले गेले, असे मानले जाते.

जेरुसलेममधील धार्मिक तणावाची पार्श्वभूमी काय?

या शहरात यहुदी आणि अरबांमधील दंगली या इस्रायलच्या स्थापनेपूर्वीपासून होत आहेत. सर्वात पहिला खटका उडाला तो १९२०च्या वसंत ऋतूमध्ये. ‘नेबी मुसा दंगल’ या नावाने कुप्रसिद्ध असलेल्या या चकमकीत पाच यहुदी आणि चार अरब नागरिक ठार झाले, तर दोन्हीकडील शेकडो लोक जखमी झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर इस्रायल अस्तित्वात आला, मात्र जेरुसलेमचा तणाव निवळला नाही. १९६७ साली झालेल्या युद्धानंतर इस्रायलने अल अक्सा असलेल्या पूर्व जेरुसलेमवर ताबा मिळविला. त्या वेळी इस्रायल, अल अक्सा मशिदीचे व्यवस्थापन करणारा जॉर्डन आणि मुस्लीम धर्मगुरूंमध्ये परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा करार झाला. त्यानुसार दोन्ही धर्मीयांच्या नागरिकांना या पवित्र स्थळी प्रार्थनेची मुभा मिळाली.

करार झाल्यानंतरही वारंवार खटके का उडतात?

सध्या या भागावर इस्रायलचा ताबा आहे. त्यामुळे आपली जमीन ‘गिळंकृत’ करणारा इस्रायल कोणत्याही क्षणी मशिदीच्या पवित्र वास्तूवर संपूर्ण दावा सांगेल किंवा तटबंदी उभारली जाईल, अशी भीती पॅलेस्टाईनला वाटते आहे. १९६७च्या कराराचा भंग करण्याचा आपला कोणताही मानस नसल्याचे इस्रायली राज्यकर्ते सांगत असले, तरी त्यावर पॅलेस्टाईनच्या नागरिकांचा विश्वास नाही. त्यामुळेच इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी बंडखोर यांच्यात वारंवार चकमकी होतात आणि त्यात अनेकांचे जीव जातात. गेल्या तीन-चार वर्षांपासून दर वसंत ऋतूमध्ये तणाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यात यंदा इस्रायलमध्ये झालेल्या सत्तांतराची भर पडली आहे.

नेतान्याहू सरकारमुळे तणावात भर का पडली?

अलीकडेच इस्रायलमध्ये बिन्यामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखाली इतिहासातील सर्वाधिक उजव्या-धर्मवादी आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे अरब जगताच्या चिंतेत भर पडली आहे. सध्या मुस्लिमांसाठी पवित्र रमजानचा महिना सुरू आहे. साधारणत: रमजानमधील शेवटचे १० दिवस मशिदीमध्ये रात्रीचा नमाज अदा करण्याची परवानगी इस्रायल देतो. मात्र आतापासूनच नमाजसाठी परवानगी द्या, अशी मागणी करत पॅलेस्टिनी नागरिकांनी अलीकडेच अल अक्सा मशिदीमध्ये दगड आणि फटाक्यांची जमवाजमव केली आहे. शिवाय या पवित्र स्थळी प्राण्यांचा बळी देण्याची (सध्या बंदी असलेली) यहुदी परंपरा पुन्हा सुरू केली जाईल, अशी भीती मुस्लीम नागरिकांना आहे. रमझान आणि आणि यहुदींचा ‘पासओव्हर हॉलिडे’ एकत्र आल्यामुळे येथे यहुदी भाविकांची गर्दीही वाढली आहे.

ताज्या हिंसाचाराचे तत्कालीन कारण काय?

काही यहुदी भाविकांना पॅलेस्टिनी अरबांनी बंदिस्त करून ठेवल्याचा आरोप करत इस्रायलच्या पोलिसांनी अल अक्सा मशिदीवर छापा टाकला. या वेळी पोलिसांनी हातबॉम्ब आणि बंदुकीच्या रबरी गोळ्यांचा वापर केल्याचा आरोप पॅलेस्टाईनने केला आहे. पहाटे झालेल्या या कारवाईत ५० अरब जखमी झाल्याचा दावा आहे. तर पोलिसांनी आपल्यावर मशिदीतून दगडफेक झाल्याचा, फटाके अंगावर टाकल्याचा आरोप केला आहे. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून गाझा पट्टी आणि लेबनॉनमधील अतिरेक्यांनी इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागण्यास सुरुवात केली तर त्याला इस्रायलने लष्करी कारवाई करून प्रत्युत्तर दिले. संयुक्त राष्ट्रे, अमेरिकेने या हिंसाचाराचा निषेध केला असला तरी ‘इस्रायलला स्वत:चा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे,’ असा सूरही लावला आहे. एकूणच जगभरात वसंत निसर्गाच्या नवनिर्मितीचा ऋतू असला तरी ऐतिहासिक, पवित्र जेरुसलेमसाठी मात्र हा धुमसणारा ऋतू असतो…

amol.paranjpe@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why do religious tensions rise in jerusalem during the spring print exp scj

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×