scorecardresearch

Premium

विश्लेषण : वसई-विरारचा पाणी प्रश्न का पेटला आहे? केवळ लोकार्पण रखडल्याने नागरिक हक्काच्या पाण्यापासून वंचित?

वसई विरार शहरात कमालीची पाणीटंचाई असताना सूर्या धरण प्रकल्प पूर्ण होऊनही केवळ लोकार्पण रखडल्याने पाणी मिळत नसल्याने रहिवाशांची नाराजी लक्षात घेऊन गेल्या काही दिवसांपासून या प्रश्नांवर राजकीय पक्षही आक्रमक झाले आहेत.

Vasai Virar water issue
वसई-विरारचा पाणी प्रश्न का पेटला आहे? केवळ लोकार्पण रखडल्याने नागरिक हक्काच्या पाण्यापासून वंचित? (प्रातिनिधिक छायाचित्र)

पालघर जिल्ह्यातील वसई-विरार आणि मीरा-भाईंदर यासारख्या वाढत्या शहरांची पाण्याची गरज भागविण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सूर्या धरण प्रकल्पाची आखणी केली आहे. या प्रकल्पाचा पुढील टप्पा झाला असून शहरांना पाणीपुरवठा करण्यात आता कोणतीही तांत्रिक अडचण राहिलेली नाही. असे असूनही केवळ लोकार्पण रखडल्याने या धरणाचे पाणी अजूनही रहिवाशांपर्यत पोहोचू शकलेले नाही.

गेल्या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सूर्या धरण प्रकल्पाचे लोकार्पण केले जाईल आणि तातडीने वाढीव पाणी नागरिकांना मिळेल असे चित्र प्रशासकीय यंत्रणांकडूनच उभे करण्यात आले होते. प्रत्यक्षात पंतप्रधानांचा दौरा पुढे ढकलला गेला आणि हक्काचे पाणीही मिळेनासे झाले अशी भावना आता वसई-विरार आणि मीरा-भाईंदरमधली नागरिकांच्या मनात आहे. शहरात कमालीची पाणीटंचाई असताना प्रकल्प पूर्ण होऊनही केवळ लोकार्पण रखडल्याने पाणी मिळत नसल्याने रहिवाशांची नाराजी लक्षात घेऊन गेल्या काही दिवसांपासून या प्रश्नांवर राजकीय पक्षही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे हा पाणी प्रश्न अधिकच पेटला आहे.

combative attitude of Sikh community
चाहे हंजूगॅस बरसाओ, या गोळीया… शेतकरी आंदोलनात ‘जट्ट दा जुगाड’
Allegation of the farmers association of abuse of onion producers
कांदा उत्पादकांची कुचेष्टा केल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप; निर्यातबंदी उठवल्याच्या अधिसूचनेची प्रतीक्षाच
Shiv Sena city chief Kalyan Mahesh Gaikwad marathi news, mahesh gaikwad is now out of danger marahi news
कल्याणचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड अतिदक्षता विभागातून बाहेर, प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा डाॅक्टरांचा दावा
KEM Hospital
लग्नानंतर आठ वर्षांनी गरोदर राहिलेल्या महिलेला पक्षाघाताचा झटका; केईएमच्या डॉक्टरांनी अशी केली गुंतागुंतीची प्रसूती

हेही वाचा – विश्लेषण : अमेरिका तैवानला का बनवतेय चीनविरुद्ध सज्ज? युक्रेन, गाझानंतर तिसऱ्या युद्धाची शक्यता किती?

सध्या वसई-विरार शहराला किती पाणी मिळते?

वसई-विरार शहराला सूर्या प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांतून सध्या २०० दशलक्ष लिटर, पेल्हार धरणातून १० दशलक्ष आणि उसगाव धरणातून २० दशलक्ष लिटर्स असा एकूण २३० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होत आहे. या शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना हा पाणीपुरवठा पुरेसा नाही अशी ओरड अगदी सुरुवातीपासून होत आहे.

पाणी टंचाई का निर्माण झाली?

गेल्या काही वर्षांपासून शहरात नव्या नागरी संकुलांची उभारणी होत आहे. महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सतत वाढत असताना बेसुमार बेकायदा बांधकामांची उभारणीही होताना दिसते. म्हाडासारखी मोठी संकुले, खासगी गृहनिर्माण प्रकल्प या भागात उभे राहात आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीतील लोकसंख्या वाढीला कोणताही धरबंध राहिलेला नाही. महापालिकेच्या आकडेवारीनुसार वसई-विरारची लोकसंख्या २४ लाखांहून अधिक आहे. महानगर पट्ट्यातील इतर शहरांची तुलना केली तर लोकसंख्या वाढीचा वेग या भागात अधिक असल्याचे पाहायला मिळते. असे असताना मिळणाऱ्या पाण्याच्या गळतीचे प्रमाण हे २० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्षात केवळ १९० दशलक्ष लिटर्स पाणी मिळते. शहराला दररोज १४२ दशलक्ष लिटर्स पाण्याची तूट भेडसावत आहे. ही तूट बरीच मोठी असून यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

सूर्याच्या अतिरिक्त पाण्याची योजना काय आहे?

वसई-विरार शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची तूट लक्षात घेऊन एमएमआरडीएने सूर्या प्रकल्पातून अतिरिक्त ४०३ दशलक्ष लिटर्स पाणी देण्याची योजना आणली आहे. त्यातील १६५ दशलक्ष लिटर्स पाणी वसई-विरार शहराला आणि २० दशलक्ष लिटर्स पाणी ६९ गावांना देण्यात येणार आहे. याशिवाय मीरा-भाईंदर शहरासाठीही या धरणाचे पाणी पुरविले जाणार आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून या प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढविण्यात आल्याने वाढीव पाण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे.

योजनेचे काम किती प्रमाणात पूर्ण झाले आहे?

आतापर्यंत कवडास येथील उदंचन केंद्राचे बांधकाम, सूर्या नगर येथील जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले आहेत. कवडास उदंचन केंद्रापासून ते काशिदकोपर जलकुंभापर्यंत ५७ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. तुंगारेश्वर येथे बोगदा तयार करण्यात आला आहे. वसई-विरार शहराला पाणी देण्यासाठी काशिदकोपर येथे संतुलन टाकी बांधण्यात आली आहे. योजनेचे काम पूर्ण झाल्याचे वसई-विरार महापालिकेने सांगितले आहे.

जलदाब चाचणी झाली आहे का?

पाणी वितरित करण्यापूर्वी जलदाब चाचणी आवश्यक असते. या योजनेतील १६५ दशलक्ष लिटर्स पाण्यापैकी ८० ते ९० दशलक्ष लिटर्स पाणी काशिदकोपर एमबीआर येथे जुलैच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध झाले होते. योजनेतील मुख्य जलवाहिनीस काशिदकोपर येथे २३ जुलै रोजी जोडणीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानंतर जलदाब चाचणी व वॉशआऊटचे काम पूर्ण झाले आहे. पाणी मिळण्याच्या प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्यामुळे वसई-विरार आणि मीरा भाईंदर येथील रहिवाशांची उत्सुकता ताणली गेली आहे.

हेही वाचा – विश्लेषण : ‘कॉक्स ॲण्ड किंग्ज’ गैरव्यवहार काय आहे? बँकांची साडेतीन हजार कोटींची फसवणूक कशी झाली?

एमएमआरडीए पाणी का देत नाही?

योजनेचे काम पूर्ण झाले असले तरी काही तांत्रिक कामे शिल्लक असल्याचे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून सतत सांगितले जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठा होण्यास विलंब होत असल्याचे कारण पुढे केले जात आहे. पाणी वितरणाची जबाबदारी वसई-विरार महापालिकेची आहे. यासंबंधीची सर्व तयारी महापालिकेने केली आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने पाणीपुरवठा सुरू करताच सूर्या धरणाचे पाणी पुढील पाच तासांत नागरिकांपर्यत पोहोचविले जाईल, अशी महापालिकेची भूमिका आहे. त्यामुळे महापालिका पाणी देण्यास तयार आहे, परंतु महानगर विकास प्राधिकरण म्हणजेच राज्य सरकार चालढकलपणाची भूमिका घेत आहे, अशी भावना नागरिकांची झाली आहे. जुलै महिन्यात पाणी प्रकल्पाचे सर्व काम पूर्ण झाले असल्याने जुलै महिन्यापासून महापालिकेने पाणीपुरवठा सुरू करण्याविषयी चार पत्रे प्राधिकरणाला दिली आहेत.

पंतप्रधानांच्या प्रतीक्षेत पाणीपुरवठा लांबला?

या प्रकल्पाचा शुभारंभ आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हावा यासाठी वेगवेगळ्या तारखांचे मुहूर्त काढले जात आहेत. राज्य सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी योजनेसाठी मध्यंतरी नवी मुंबईत एका मोठ्या प्रकल्पाची आखणी करण्यात आली होती. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सूर्या धरणाच्या नव्या टप्प्याचा शुभारंभ करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र मोदी यांच्या कार्यक्रमात बदल झाला आणि प्रकल्पाचे लोकार्पणही लांबले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. पाण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून राजकीय पक्ष आणि संघटनांचे शहरात मोर्चे निघत आहे. शिवसेनेने (ठाकरे गट) एमएमआरडीए कार्यालयावर मोर्चा काढला होता. याशिवाय पालिका आणि विभागीय कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले होते. भाजपनेही मोर्चा आणला होता. सत्तेत असलेल्या खासदार राजेंद्र गावित यांनाही या प्रश्नावर रस्त्यावर उतरावे लागले होते. मनसे आणि आता स्थानिक सत्ताधीश असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनीही या प्रश्नावर आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why is the vasai virar water issue burning print exp ssb

First published on: 09-11-2023 at 09:09 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×