पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याभोवतीचा फास आणखी आवळण्यास पाकिस्तान सरकारने सुरुवात केली आहे. मागच्या काही दिवसांपासून इम्रान खाना यांना शोधणे सरकारसाठी कठीण झाले आहे. पाकिस्तानी माध्यमांवर त्यांचे नाव आणि फोटो झळकवूनही त्यांचा पत्ता लागत नाही. त्यानंतर आता सरकारने इम्रान खान यांच्याशी संबंधित सोशल मीडिया अकाऊंटवर टाच आणली आहे. ८ मार्च ते ९ मे दरम्यान इम्रान खान आणि त्यांच्या पक्षातील काही नेत्यांनी सोशल मीडियावर सरकारविरोधी मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी सरकारने संघीय तपास यंत्रणेकडे त्यांच्याशी संबंधित असलेल्या लिंक दिल्या आहेत, अशी माहिती पाकिस्तानी माध्यमांनी गुरुवारी दिली. इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल होऊन अटक झाल्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंध लावण्यात आले होते. मागच्या महिन्यात ९ मे रोजी त्यांना अटक होऊन इस्लामाबाद येथील न्यायालयात आणण्यात आले, तेव्हा देशभरात हिंसक आंदोलने पाहायला मिळाली.

हे वाचा >> विश्लेषण: पाकिस्तानला सार्वत्रिक निवडणुका घेणे परवडू शकते का?

सोशल मीडिया अकाऊंट्सची न्यायवैद्यक चौकशी

पाकिस्तानमधील समा टीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, इम्रान खान आणि त्यांच्या ‘तेहरीक-ए-इन्साफ’ (PTI) या पक्षातील काही नेत्यांशी संबंधित इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरच्या लिंक एफआयएकडे तपासासाठी देण्यात आल्या आहेत. एफआयए ही पाकिस्तानची राष्ट्रीय तपास यंत्रणा असून संघराज्यातील गुन्ह्यांचा तपास करण्याचे काम या सर्वोच्च यंत्रणेकडे देण्यात येते. पोलिसांनी सांगितल्यानुसार, पीटीआय पक्षातील नेते शाह महमूद कुरेशी, मुराद सईद आणि हम्मद अजहर यांनी व्हिडीओ आणि पोस्टच्या माध्यमातून जो मजकूर पोस्ट केला त्याची तपासणी होईल. तसेच ९ मे रोजी उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इतर काही नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्ये केली होती का? याचा संयुक्त तपास केला जाणार आहे.

समा टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, पीटीआयमधील वरिष्ठ नेत्यांनी सोशल मीडियाच्य माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर वितरित केला होता, असाही त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. सोशल मीडिया लिंक्सच्या न्यायवैद्यक चाचणीचा रिपोर्ट हा अंतिम तपास अहवालाचा भाग असणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांना राज्याविरोधात भडकविण्यात आल्याचा निष्कर्ष पाकिस्तानी सरकारच्या अंतर्गत अहवालानुसार काढण्यात आला आहे.

हे वाचा >> Video: पाकिस्तानी लोक दोन वेळच्या जेवणाला मोहताज; गहू मिळवण्यासाठी चालत्या ट्रकमागे करतात जीवघेणी धावपळ

तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर हिंसाचार उसळला, या गुन्ह्यासाठी १४ मे रोजी ५६४ लोकांवर गुन्हे दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, अशी बातमी पाकिस्तानी दैनिक’डॉन’ (Dawn) ने दिली आहे. अटकेनंतर झालेल्या हिंसाचारात सरकारच्या २५ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

सरकारची कडक कारवाई

इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराची ७० प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. ९ मे रोजी त्यांना अटक केल्यानंतर इस्लामाबाद न्यायालयाने जामीन दिला. इम्रान खान यांना अटक होताच, त्यांच्या समर्थकांनी लष्कराच्या २० केंद्र आणि सरकारी इमारतींचे नुकसान केले. यामध्ये लाहोर कॉर्पोरेशन कमांडर हाऊस, मियानवाली एअरबेस आणि फैसलाबाद मधील आयएसआय इमारतीचे नुकसान झाले. तसेच इतिहासात पहिल्यांदाच रावळपिंडीमधील लष्कराच्या मुख्यालयावर गर्दीने हल्ला केला.

९ मे रोजी ज्या लोकांनी सरकार आणि लष्कराच्या मालमत्तांचे नुकसान केले, त्यांच्यावर लष्कर कायदा (Army Act) आणि अधिकृत गुपित (Official Secrets Act) कायद्याच्या आधारे कडक कारवाई केली जाणार असल्याचा निर्णय पाकिस्तानच्या संघीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. पाकिस्तानी मुस्लीम लीग (नवाज) पक्षाच्या आघाडी सरकारने मागच्या वर्षी इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आणून त्यांना सत्तेतून दूर केले होते. तेव्हापासून इम्रान खान मुस्लीम लीग विरोधात आवाज उठवत आहेत.

आणखी वाचा >> दिवाळखोर पाकिस्तानकडे ‘हज यात्रे’साठी पैसे नाहीत? हजचे अनुदान रद्द करण्याचा पाकिस्तानचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकार आणि लष्कराविरोधात हिंसक प्रतिक्रिया उमटल्यामुळे या हिंसाचारात सहभागी असलेल्या लोकांवर कडक कारवाई करण्यासाठी सरकार आणि लष्कराचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस यंत्रणेने इम्रान खान यांच्या पक्षाच्या १० हजार लोकांना ताब्यात घेतले होते, त्यापैकी चार हजार लोक पंजाब प्रांतातील होते. पंजाब प्रांतातील गृह विभागाने १० विशेष चौकशी पथके स्थापन केली असून ९ मे रोजी झालेल्या हिंसाचाराची चौकशी सुरू केली आहे. पाकिस्तानी सैन्याने या दिवसाला ‘काळा दिवस’ संबोधले आहे. खान यांच्यावर देशभरात विविध ठिकाणी १०० हून अधिक खटले सुरू आहेत.