राखी चव्हाण
राज्यातील जंगलांवर एकीकडे प्रकल्पांचे आक्रमण होत असतानाच दुसरीकडे वणव्यांमुळे जंगल मोठ्या प्रमाणात नाहीसे होत असल्याचे भारतीय वनसर्वेक्षणच्या अहवालातून समोर आले आहे. संपूर्ण राज्यात गेल्या सात वर्षात एक लाख ७० हजार ६६०.०८७ हेक्टर जंगल वणव्यात नाहीसे झाले.
वणव्याचे सर्वाधिक अलर्ट कोणत्या जिल्ह्यात ?
२०२१ हा करोनाकाळ असतानादेखील राज्यात ६३ हजार ८४६ वणव्यांचे ‘अलर्ट’ आले. ज्यात सर्वाधिक अलर्ट गडचिरोली जिल्ह्यात आले. २०१८ ते २०२३ या कालावधीत याच जिल्ह्यात सर्वाधिक ११ हजार ५२७ वणव्याच्या घटना घडल्या. ज्यात ३३ हजार ८७०.४५३ हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. गडचिरोलीपाठोपाठ कोल्हापूर, ठाणे, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वणव्याचे ‘अलर्ट’ आलेत. तर वणव्याच्या घटना या जिल्ह्यांसह अमरावती जिल्ह्यात नोंदवण्यात आल्या.
वणव्याची गेल्या सहा वर्षातील राज्याची स्थिती काय?
२०१८ साली राज्यात वणव्याच्या ८,३९७ घटना घडल्या. ज्यात ४४,२१९.७३ हेक्टर जंगल जळाले. २०१९ साली ७,२८३ वणव्याच्या घटनांमध्ये ३६,००६.७२७ हेक्टर जंगल जळाले. २०२० साली ६,३१४ वणव्यच्या घटनांमध्ये १५,१७५.९५ हेक्टर जंगल जळाले. २०२१ मध्ये १०,९९१ वणव्याच्या घटना घडल्या. ज्यात ४०,२१८.१३ हेक्टर जंगल जळाले. २०२२ मध्ये ७,५०१ वणव्याच्या घटना २३,९९०.६७ हेक्टर जंगल जळाले. २०२३ मध्ये ४,४८२ वणव्यच्या घटनांमध्ये ११,०४८.८८ हेक्टर जंगल जळाले.
वणवा म्हणजे काय ?
वणवा म्हणजे नैसर्गिक तसेच अनैसर्गिक कारणास्तव डोंगराळ, गवताळ प्रदेश तसेच जंगल या ठिकाणी लागलेली आग. अमेझॉन जंगलात जवळपास तीन वर्षांपूर्वी आग लागलेली त्यातून जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले . कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होत असताना जंगल हे उत्सर्जन सामावून घेतो. पण तेच जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले तर ऑक्सिजन मिळणे कठीण होते. कॅनडामध्येदेखील मोठ्या प्रमाणावर आग लागली आणि लाखो हेक्टर जंगल जळून खाक झाले. या धुरामुळे कॅनडातीलच नव्हे तर लगतच्या देशही प्रभावित झाला. भारतातही दरवर्षी उन्हाळ्यात हजारो हेक्टर जंगल आगीत जळून खाक होते.
वणवा लागण्याची कारणे काय?
निसर्गात नैसर्गिकरित्या वाढलेला तापमानातून तसेच झाडांच्या फांद्या एकमेकांना घासून त्यातून होणाऱ्या घर्शनाने आग निर्मिती होते. उन्हाळ्यात वातावरणातील तापमानात वाढ झाल्यामुळेदेखील वणवा लागतो. तर कधी मानवाच्या हलगर्जीमुळे, बेसावधपणामुळे, तर कधी जाणून-बुजून तेंदूपत्ता, मोहफुले अधिक यावी म्हणून ठेकेदार जंगलाला आग लावतात. नंतर तीच आग रौद्ररूप धारण करून पसरत जाते. तसेच झाडांची पाने सडून तेथे मिथेन वायु तयार होतो आणि वातावरणात तो पेट घेतो. या सर्व कारणास्तव वणवा निर्माण होतो.
मणिपूरमधील महिलांचा व्हिडिओ हटवण्याचे समाजमाध्यमांना निर्देश, ‘कलम ६९ अ’ काय आहे?
वणव्याबाबतचा ग्रामीण भागातील गैरसमज काय?
ग्रामीण भागात चराई क्षेत्र जंगलालगत असेल तर बऱ्याच गैरसमजांपैकी एक असा आहे की वाळलेले गवत तसेच ठेवले, जाळले नाही तर जुन्या गवताचे देठ तसेच कठीण राहते. नवीन आलेल्या गवतावर गुरे चराईसाठी गेल्यावर हे देठ जनावरांच्या ओठाला लागले जातात. त्यामुळे जनावरांना व्यवस्थित चरता येत नाही. अशी चुकीची समजूत रूढ आहे. म्हणून वाळलेले गवत उन्हाळ्यात पेटवले जाते. यामुळे वणवा लागला जातो. काही ठिकाणी जुने गवत पेटवले तरच पावसाळ्यात नवीन चांगले गवत येते अशीही समजूत रूढ आहे.
वणव्याचे दुष्परिणाम काय?
वणव्यात बरीच झाडे जळून जातात तसेच मोठ्या झाडांच्या आसपास छोटी मोठी झाडांची रोपटी असतात तीही वणव्यातील मोठ्या आगीमुळे जळून जातात. वणवा लागल्यामुळे जंगलांच्या वाढीला अडथळा निर्माण होतो व कित्येक काळ वाढीच्या मानाने मागे जातात. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन ऑक्सिजन वातावरणास पुरवतात. म्हणजेच वातावरणातील कार्बन प्रमाण कमी करण्यास झाडे मदत करतात. वणव्यामुळे उलट त्यात वाढ होते. वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे कार्बन प्रमाणही वाढते. एकदा वणवा भडकल्यानंतर कित्येक महिने आग तशीच राहू शकते.
वणव्यामुळे नैसर्गिक समतोल बिघडतो का?
वणव्यामुळे बऱ्याच वृक्ष प्रजाती ज्या अत्यल्प आहेत, त्या नामशेष होतात. तसेच इतरही प्रकारच्या झाडाझुडपांची हानी होते. त्यांच्याबरोबर वनांमध्ये राहणाऱ्या प्राणी, पक्षी यांचेही मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. बऱ्याच प्राणी पक्षी प्रजाती अशा आहेत ज्या लुप्त होण्याचा मार्गांवर आहेत. छोट्या कीटकांपासून ते मोठ्या प्राण्यापर्यंत वणव्यात मृत्युमुखी पडल्याच्या घटना आहेत. जंगल भागात काही प्राणी तसेच वृक्षांच्या प्रजाती कमी होत चालल्या आहेत. त्यात वणव्यामुळे सदर प्रजाती लुप्त होऊ शकतात. वणव्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षांचा ऱ्हास होतो. यामुळे नैसर्गिक असमतोल तयार होतो.
वणवा लागू नये म्हणून उपाय काय?
वनविभागाकडून याबाबतीत उपाय योजना म्हणून डोंगर भागात, पठारी भागात आधीच काही मीटरचा पट्टा देखरेखीत जाळला जातो. याचे कारण म्हणजे आधीच काही भाग जळल्यानंतर जळण्यासाठी पाने, सुकलेली लाकडे आधीच जळल्यानंतर वणवा लागण्यासाठी कोणतीही सामग्री राहत नाही. यामुळे आग पसरण्याचे थांबते. वणवा तयार झालाच तरी एक भागातून दुसऱ्या भागात जात नाही. त्यामुळे तो आटोक्यात राहतो. परिणामी वनांचे संरक्षण होते. हवेतील कार्बन कमी झाल्यास तापमान वाढ कमी होईल. तापमान वाढीमुळे लागणारे वणवे कमी होतील. यामुळे नैसर्गिक हानी वाचेल. जंगल वाचण्यास वृक्ष वाढीस मदत होईल.
rakhi.chavhan@expressindia.com