दत्ता जाधव

जागतिक मृदा दिन ५ डिसेंबरला साजरा करण्यात आला. यंदाच्या मृदा दिनाला विशेष महत्त्व आहे. कारण जगाची लोकसंख्या आठ अब्जांवर गेली आहे. दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी, गारपीट, उष्णतेच्या लाटांमुळे अन्नधान्याच्या उत्पादनात मोठी तूट आली आहे. या पार्श्वभूमीवर आपणा सर्वाची अन्नदात्री असलेल्या काळय़ा आईचे आरोग्य जपणे गरजेचे आहे.

Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
Cyber Criminal, Small Amount Fraud, target, Cyber Police, Maharashtra, Unwilling to Register, small fraud cases,
सायबर फसवणुकीच्या हजारो तक्रारींची नोंदच नाही; कोट्यवधी रुपये गुन्हेगारांच्या घशात
Panvel water
‘पिण्यासाठी पाणी द्या, मग पाणी बचतीचा संदेश द्या’

माती कशी तयार होते?

माती प्रयोगशाळेत, कारखान्यांत तयार होत नाही. माती तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. ऊन, वारा, पाऊस व पाण्याचा प्रवाह अशा विविध गोष्टींचा परिणाम खडकांवर होतो. खडकांची झीज होऊन माती तयार झाली. ही प्रक्रिया लाखो वर्षे सुरू होती. साधारण एक सेंटिमीटर मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. या मातीमध्ये मृत प्राण्यांचे अवशेष, प्राण्यांची विष्ठा, कुजलेल्या वनस्पतींचे अवशेष असतात. सेंद्रिय पदार्थ व खनिज पदार्थ यांनी माती तयार होते. जमिनीच्या पृष्ठभागावरील १० ते १५ सेंटिमीटरचा मातीचा थर हा पृथ्वीवरील जीवांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असतो.

जागतिक मृदा दिन का साजरा केला जातो?

मातीच्या खालावलेल्या स्थितीबद्दल जनजागृती करण्यासाठी ‘इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉइल सायन्स’ने २००२मध्ये संयुक्त राष्ट्रांत एक प्रस्ताव दिला. ५ डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा करावा, अशी मागणी त्यात होती. त्यानंतर जून २०१३ मध्ये अन्न आणि कृषी संघटनेने संयुक्त राष्ट्रांच्या ६८व्या महासभेत जागतिक मृदा दिवस साजरा करण्याची आग्रही मागणी केली. ५ डिसेंबर २०१४ हा पहिला अधिकृत जागतिक मृदा दिवस म्हणून घोषित केला गेला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जात आहे. ‘माती : जेथे अन्न सुरू होते’ हे यंदाच्या मृदा दिवसाचे सूत्र होते. मातीचे आरोग्य जपण्यासाठी जागरूकता वाढवणे, मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी समाजाच्या सहभागास प्रोत्साहन देणे, मानवी जीवनासाठी निरोगी परिसंस्था आणि निरोगी वातावरण राखणे, यासाठी जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो.

मातीचे आरोग्य का जपले पाहिजे?

शेतीच्या मशागतीच्या चुकीच्या पद्धती, जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, मुसळधार पाऊस यामुळे जमिनीची धूप होते. हजारो वर्षांनी तयार झालेला हा मातीचा थर नष्ट व्हायला अत्यल्प कालावधीही पुरेसा ठरतो. जमिनीची धूप झाल्यामुळे सुपीक माती वाहून जाते. सुपीक जमिनीत पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाळू, खडकांचे बारीक तुकडे वाहत येतात. त्यामुळे जमीन नापीक होण्याची शक्यता असते. भारताची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. परंतु वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, धरण, रस्ते, इ. विविध कारणांमुळे सुपीक जमीन नष्ट होत आहे. लागवडीलायक क्षेत्रात घट होत आहे. एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येची अन्नाची गरज भागविण्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढविणे गरजेचे आहे, त्यासाठी आवश्यक आहे सुपीक जमीन. मात्र, ही जमीन आता नापीक होत आहे.

सुपीक माती नापीक का होते आहे?

माणसाला शेतीचा शोध लागला तेव्हा आदिम काळातील माणूस प्राण्याची शिकार करून जगण्याबरोबरच शेती करून अन्नधान्य पिकवून आपला उदरनिर्वाह करू लागला. तेव्हापासून म्हणजे हजारो वर्षांपासून ही माती आपले पोट भरत आहे. आपण वर्षांनुवर्षांपासून जमिनीतून अन्नधान्य, फळे, भाजीपाला, जनावरांसाठी चाऱ्याचे उत्पादन घेत आहोत. हळूहळू वाढती गरज भागविण्यासाठी रासायनिक खते, औषधांचा वापर वाढला. भारतासारख्या देशात शेतकरी एका वर्षांत तीन पिके घेऊ लागले. याचा परिणाम म्हणून मातीचा कस कमी झाला. मातीचे आरोग्य बिघडले. त्यामुळे लाखो हेक्टर जमीन नापीक झाली. खारट झाली. जगभरात जमीन नापीक होण्याचे प्रमाण वाढले आहे. जमिनीचा कस सुधारला नाही तर वाढलेल्या लोकसंख्येचे पोट कसे भरायचे, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी भारतातच नाही तर जगभरात मातीचे आरोग्य जपण्यासाठी, मातीचा कस सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

माती सजीव, जिवंत असते?

माती सजीव नसतेच, पण माती अनेक सजीवांना स्वत:मध्ये सामावून घेते. माती ही एक परिसंस्था आहे, जिथे विविध जिवाणू, सूक्ष्मजीव, वनस्पतींची मुळे, खनिजांचे कण आणि सेंद्रिय पदार्थ एकत्र असतात. ज्यामुळे पाणी, हवा आणि पोषक तत्त्वांचे नियमन होते. मातीचे उत्तम आरोग्य कृषी उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी, पर्यावरणीय संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी गरजेचे असते. निरोगी माती वनस्पतींच्या वाढीस पोषणमूल्य पुरविण्याचे काम करते. माती स्वत: पोषणमूल्यांची साखळी चालवते, ज्यात कीटकांचे जैविक नियंत्रण, पाणी आणि हवा यांचे नियमन झालेले असते.

मातीचे आरोग्य कसे जपता येईल?

शेतकरी आजवर नत्र, स्फुरद, पालाशचा समावेश असलेली मिश्र खते आणि नत्रासाठी युरिया वापरत आले आहेत. देशातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर युरिया वापरतात. हा युरिया मातीचे आरोग्य बिघडवतो, जमिनी नापीक करतो. खतांच्या बेसुमार वापरामुळे मातीची अंगभूत क्षमता नष्ट होते. त्यामुळे पिकांची उगवण, वाढ व्यवस्थित होत नाही. अलीकडे माती परीक्षणाच्या विविध सोयी उपलब्ध झाल्या आहेत. केंद्र, राज्य सरकारने त्याबाबत अनेक योजना सुरू केल्या आहेत. माती परीक्षणातून नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सल्फर व सूक्ष्म अन्नद्रव्ये लोह, जस्त, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम इत्यादींचे प्रमाण कळते. आपल्या जमिनीत नेमके काय कमी आहे, हे कळल्यानंतर जे कमी आहे, ते वाढवले तर जमिनीचे आरोग्य सुधारेल, उत्पादकता वाढेल.

नैसर्गिक, रासायनिक शेतीचा समन्वय गरजेचा?

आज नैसर्गिक आणि रासायनिक शेतीत योग्य समन्वय साधण्याची गरज आहे. पिकाचे अवशेष जमिनीत कुजणे, मृत प्राण्यांचे विघटन होणे, प्राण्यांची विष्ठा (शेणखत) जमिनीत मिसळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण गरजेपेक्षाही कमी झाले आहे. त्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. याशिवाय जमिनीत आवश्यक असणारे रासायनिक घटक, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण गरजेइतके ठेवण्यासाठी रासायनिक खते आणि रासायनिक अन्नद्रव्ये कृत्रिमपणे बाहेरून मिसळण्याची गरज आहे. नैसर्गिक आणि रासायनिक शेतीत योग्य समन्वय साधल्यास मातीचे आरोग्य चांगले राहील आणि वाढलेल्या लोकसंख्येचे पोटही भरेल.

dattatray.jadhav@expressindia.com