पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या आणखी एका यूट्यूबरला अटक करण्यात आली आहे. या यूट्यूबरचे ज्योती मल्होत्राशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. पंजाबमधील मोहाली येथील स्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेल (एसएसओसी)ने पाकिस्तानसमर्थित असलेल्या दहशतवादाशी संबंधित गुप्तहेर नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. त्यात जान महल या नावाने यूट्यूब चॅनल चालविणाऱ्या यूट्यूबरला अटक करण्यात आली आहे. त्याचे यूट्यूबवर तब्बल ११ लाख सबस्क्रायबर्स आहेत. कोण आहे जसबीर सिंग? त्याला नक्की कशी अटक झाली? पोलीस अधिकारी नक्की काय म्हणाले? त्याविषयी जाणून घेऊ…

कोण आहे जसबीर सिंग?

जसबीर सिंग हा एक भारतीय नागरिक असून, त्याचे जान महाल नावाने यूट्यूब चॅनेल आहे. त्याने आपल्या चॅनेलवर मलेशिया, मालदीव आणि इतर देशांचे प्रवासाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्याने तब्बल तीन वेळा पाकिस्तानमध्ये प्रवास केला आहे. पाकिस्तानी हँडलर्सच्या अंतर्गत काम करणाऱ्या पीआयओशी जवळचे संबंध ठेवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पंजाब पोलिस महासंचालक (डीजीपी) यांच्या मते, सिंग हा हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा ​​आणि भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातून हाकलून लावण्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिक एहसान-उर-रहीम ऊर्फ ​​दानिश यांच्या संपर्कात होता, अशीही माहिती समोर आली आहे.

जसबीर सिंगला दानिशने दिल्लीतील पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात त्याने पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि व्लॉगर्सशी संवाद साधला होता. अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की, जसबीर सिंगने २०२०, २०२१ व २०२४ मध्ये तीनदा पाकिस्तानला प्रवास केला होता.

तो काय करायचा?

जसबीर सिंगच्या ताब्यातून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरून पाकिस्तानमधील संपर्क क्रमांक उघड झाले आहेत. या क्रमांकांचा तपास आता सुरू आहे. ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर सिंगने हेरगिरी नेटवर्कशी असलेल्या संपर्काचे सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे. परंतु, तपासकर्त्यांना त्याच्याजवळून संशयित दहशतवादी-समर्थित गुप्तचर यंत्रणांशी संबंधित महत्त्वाचा डेटा प्राप्त झाला आहे. सिंग हा शकीर ऊर्फ ​​जुट रंधावाशीदेखील जोडला गेला होता. रंधावा हा दहशतवादाशी संबंधित नेटवर्कमधील प्रमुख पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) होता.

सिंगविरोधात एफआयआर दाखल

मोहाली येथील एसएसओसी येथे त्याच्याविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. हेरगिरीच्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेण्यासाठी, तसेच आणखी हेरांची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू आहे. पंजाब पोलिसांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षेप्रति आपली वचनबद्धता व्यक्त केली. पंजाब पोलीस उपायुक्त म्हणाले, “पंजाब पोलीस राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहेत आणि पंजाब पोलीस देशविरोधी घटकांना या भूमीवर वाढू देणार नाहीत.”

पोलीस अधिकारी काय म्हणाले?

पोलिसांचे म्हणणे आहे की, ते हेरगिरी-दहशतवादी नेटवर्क उघड करण्यासाठी आणि त्यात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी काम करीत आहेत. पंजाब पोलिसांनी त्यांच्या ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे, ” ‘जान महल’ नावाचे यूट्यूब चॅनेल चालवणारा जसबीर सिंग हा दहशतवादी-समर्थित हेरगिरी नेटवर्कचा भाग असलेल्या पीआयओ शाकीर ऊर्फ ​​जुट रंधावाशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. त्याचे हरयाणा येथील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि पाकिस्तानी उच्चायुक्तालयातून हद्दपार करण्यात आलेला एहसान-उर-रहीम ऊर्फ ​​दानिश यांच्याशीही जवळचा संपर्क होता.”

आतापर्यंत पंजाब पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली सात जणांना अटक केली आहे. त्यात फलकशेर मसीह व सूरज मसीह यांना अमृतसरमधील अजनाला येथून अटक करण्यात आली आहे. मालेरकोटला येथील रहिवासी असलेल्या ३१ वर्षीय गुजाला व यामीन मोहम्मद यांनाही गेल्या महिन्यात अटक करण्यात आली आहे. तसेच, आयएसला संवेदनशील लष्करी माहिती शेअर केल्याप्रकरणी सुखप्रीत सिंग आणि करणबीर सिंग यांना गुरदासपूर येथून अटक करण्यात आली आहे.

सिंगचे ज्योती मल्होत्रा ​​कनेक्शन

प्राप्त माहितीनुसार, तो ज्योती मल्होत्राच्या जवळच्या संपर्कात होता. ती सध्या पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत आहे. सिंगने २०२०, २०२१ व २०२४ मध्ये पाकिस्तानला भेट दिली आहे. जसबीर सिंगच्या अटकेनंतर, त्याचा एक जुना व्हिडीओ समोर आला होता, त्यामध्ये तो गेल्या वर्षी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये फिरताना दिसत होता. गेल्या महिन्यात पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली ट्रॅव्हल व्लॉगर ज्योती मल्होत्रादेखील व्हिडीओमध्ये दिसून आली आहे. व्हिडीओमध्ये जसबीर सिंग आणि ज्योती मल्होत्रा ​​रस्त्यावरील खाद्यपदार्थांचा आनंद घेत, खरेदी करताना आणि स्थानिकांशी संवाद साधताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिसारची रहिवासी असलेल्या ‘ट्रॅव्हल विथ जो’ हे यूट्यूब चॅनेल चालवणाऱ्या ३३ वर्षीय ज्योती मल्होत्राला गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयात असलेल्या एहसान-उर-रहीम ऊर्फ ​​दानिशवरचेही हेरगिरीचे आरोप सिद्ध झाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आणि त्यानंतर पाकिस्तानशी झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर देशातील गुप्तचर नेटवर्कवर ही कारवाई करण्यात आली आहे.