25 September 2020

News Flash

गाथा शस्त्रांची : जर्मन एफजी-४२ : स्वयंचलित बंदुकांच्या दिशेने प्रवास

सेल्फ-लोडिंग रायफलच्या निर्मितीचे प्रयत्न सुरू होते

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

रशियामध्ये पहिल्या महायुद्धापासूनच स्वयंचलित (ऑटोमॅटिक), सेल्फ-लोडिंग रायफलच्या निर्मितीचे प्रयत्न सुरू होते. मात्र प्रत्यक्षात वापरण्यायोग्य डिझाइन विकसित होण्यास १९३० आणि १९४० चे दशक उजाडले. रशियामध्ये १९३६ साली गॅस-ऑपरेटेड सिमोनोव्ह एव्हीएस ३६ ही रायफल मर्यादित प्रमाणात वापरात आली. त्यानंतर दोन वर्षांनी टोकारेव्ह एसव्हीटी ३८ ही रायफल अस्तित्वात आली. या दोन्ही बंदुका रणभूमीवरील धउळीने आणि मातीने भरलेल्या वातावरणात वापरण्यासाठी पुरेशा दणकट नव्हत्या. त्यामुळे एसव्हीटी ३८ च्या जागी एसव्हीटी ४० ही टोकारेव्ह यांचीच रायफल वापरात आली. ती आधीच्या मॉडेल्सपेक्षा अधिक दणकट, सेमी-ऑटोमॅटिक आणि १० गोळ्या मावणारी रायफल होती. मात्र या रायफलमधील शक्तिशाली काडतूस डागताना खांद्याकडे जोराचा धक्का (रिकॉइल) बसत असे. त्याचा त्रास कमी करण्यासाठी एसव्हीटी ४० रायफलच्या बॅरलच्या पुढील भागात मोठा ‘मझल ब्रेक’ बसवण्यात आला. मझल ब्रेक, कॉम्पेन्सेटर किंवा फ्लॅश सप्रेसर नावाने ओळखले जाणारे उपकरण बंदुकीच्या नळीच्या टोकाला बसवले जाते. त्याने बाहेर पडणारे गरम वायू  बाजूला किवा वर फेकले जातात. त्यामुळे गोळी झाडल्यावर बंदुकीला मागे बसणारा धक्का आणि बॅरल वर उचलले जाण्याचा प्रभाव कमी होतो आणि बंदुकीचा अचूकता व सहजता वाढते.

दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैनिकांनी रशियन सैन्याकडून मोठय़ा प्रमाणात टोकारेव्ह एसव्हीटी-४० रायफल काबीज केल्या. जर्मनांनी त्यांचे नाव बदलून ओ-१ गेवेर २५९ (आर) असे केले आणि त्या पुन्हा रशियन सैनिकांविरुद्धच वापरल्या. या बंदुकीतून जर्मनांना अधिक प्रभावी  गॅस-ऑपरेटेड सिस्टिम तयार करण्याचे तंत्र गवसले. त्यातून जर्मन गेवेर-४१ आणि एफजी-४२ (Fallschirmjägergewehr 42) या रायफल्स विकसित झाल्या.

दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला जर्मन सैन्याला त्यांच्या जुन्या बोल्ट-ऑपरेटेड कार्बिनर-९८ के या कार्बाइन बदलण्यासाठी नव्या रायफलची गरज होती. ती माऊझर गेवेर-४१ मधून भरून निघाली. मात्र ती रणभूमीवर फारशी प्रभावी ठरली नाही. तिची गुंतागुंतीची गॅस-ऑपरेटेड ब्लो-बॅक प्रणाली माजी अडकून बंद पडत असे. तसेच तिचे वजनही जास्त होते.

या त्रुटी दूर करून एफजी-४२ तयार झाली. ती प्रामुख्याने जर्मन छत्रीधारी सैनिकांसाठी (पॅराट्रपर्स) बनवली होती. त्यात धातूचा कमीतकमी वापर करून वजन कमी केले होते. त्याला २० गोळ्यांचे बॉक्स मॅगझिन होते. गॅस-ऑपरेटेड प्रणाली अधिक कार्यक्षम बनवली होती. पण पूर्ण ऑटोमॅटिक मोडवर फायरिंग करताना तिच्या शक्तिमान काडतुसांचा धक्का या हलक्या बंदुकीला सहन होत नसे. त्यावर मात करून थोडी जड आणि प्रभावी एफजी-४२-२ ही आवृती १९४४ साली वापरात आली.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2018 1:02 am

Web Title: different types of weapons part 25
Next Stories
1 गाथा शस्त्रांची : पडत्या काळात ब्रिटनला तारणारी स्टेन गन
2 सब-मशिनगन आणि असॉल्ट रायफलचा उदय
3 अमेरिकी एम १ गरँड रायफल
Just Now!
X