23 January 2021

News Flash

ध्रुव हेलिकॉप्टर

भारतात १९७० च्या दशकाच्या अखेरीस स्वत:चे हेलिकॉप्टर विकसित करण्याचा विचार जोर धरू लागला.

बंगळूरुस्थित हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) विकसित केलेल्या विमानांपेक्षा ध्रुव या हेलिकॉप्टरला अधिक यश मिळाले आहे. आज हे हेलिकॉप्टर भारतीय सेनादलांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वापरले जात आहेच, तसेच नेपाळ, इस्रायल, इक्वेडोर, मॉरिशस, मालदीव या देशांनी ते विकत घेतले आहे. त्याशिवाय अन्य काही देशांकडून ध्रुवला मागणी येत आहे.

भारतात १९७० च्या दशकाच्या अखेरीस स्वत:चे हेलिकॉप्टर विकसित करण्याचा विचार जोर धरू लागला आणि १९८४ साली एचएएलकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. हा प्रकल्प अ‍ॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर (एएलएच) नावाने ओळखला जात होता. वजनाला तुलनेने हलके, म्हणजे साधारण ५ ते ५.५ टन वजनाचे, विविध वातावरणांत वापरता येण्याजोगे, सैनिकांची आणि सामानाची वाहतूक करू शकणारे (युटिलिटी) हेलिकॉप्टर विकसित करण्याचा उद्देश होता. एचएएलने जर्मनीच्या एमबीबी या एरोस्पेस कंपनीच्या सहकार्याने हे काम सुरू केले. या हेलिकॉप्टरच्या पहिल्या प्रारूपाचे यशस्वी उड्डाण १९९२ साली झाले. मात्र भारताने र्सवकष अणुचाचणीबंदी कराराला (सीटीबीटी) केलेला विरोध आणि १९९८ साली पोखरण येथे केलेल्या दुसऱ्या अणुस्फोटांनंतर आलेले र्निबध, सेनादलांनी हेलिकॉप्टरच्या रचनेबाबतचे वेळोवेळी बदललेले निकष, निधीची कमतरता आदी कारणांमुळे हेलिकॉप्टरच्या पुढील विकासाला विलंब झाला. सुरुवातीला या हेलिकॉप्टरसाठी रोल्स-रॉइस आणि हनीवेल या कंपन्यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या एलएचटेक या कंपनीची टी-८००ही इंजिने वापरली जाणार होती. पण र्निबधांनंतर ती मिळणे कठीण झाले. त्यामुळे नंतर फ्रेंच टबरेमेका कंपनीची टीएम-३३३ २-बी-२ ही टबरेशाफ्ट इंजिने मिळवण्यात आली. त्यावर आधारित हेलिकॉप्टरची रचना करण्यात आली.

ध्रुव हेलिकॉप्टर २००२ साली भारतीय सेनादलांत दाखल झाले. भूदल, नौदल, हवाईदलासह, तटरक्षक दल (कोस्ट गार्ड) आणि सीमा सुरक्षा दलानेही (बीएसएफ) ध्रुव हेलिकॉप्टर स्वीकारली. मात्र लष्कराला त्याबाबत काही अडचणी होत्या. हिमालयाच्या उत्तुंग पर्वतराजींमध्ये आणि सियाचीन हिमनदी क्षेत्रात वापरण्यासाठी लष्कराला समुद्रसपाटीपासून ६५०० मीटर उंचीवर कामकरू शकणारे हेलिकॉप्टर हवे होते. ध्रुवच्या मार्क-१ आणि मार्क-२ या आवृत्ती त्यासाठी सक्षम नव्हत्या. त्यानंतर टीएम-३३३ इंजिनाची शक्ती नावाची सुधारित आवृत्ती वापरून ध्रुवची मार्क-३ ही आवृत्ती तयार करण्यात आली. या आवृत्तीने सियाचीनमध्ये ८४०० मीटर उंचीवर उड्डाण केले आणि लष्कराने ध्रुव स्वीकारले.

ध्रुवच्या मार्क-१, मार्क-२ आणि मार्क-३ या आवृत्ती प्रामुख्याने सैन्य आणि सामान व शस्त्रांच्या वाहतुकीसाठी, जखमी सैनिकांना रुग्णालयात नेण्यासाठी, शोध आणि बचाव कार्यासाठी वापरल्या जातात. त्यांच्यावर माफक प्रमाणात शस्त्रे बसवता येतात. ध्रुवची मार्क-४ ही आवृत्ती लढाऊ हेलिकॉप्टर म्हणून विकसित केली आहे. तिला रुद्र असे नाव आहे. त्यावर २० मिमी व्यासाची कॅनन, ७० मिमी व्यासाची रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रे बसवता येतात. ध्रुवचे साधारण ९० टक्के भाग स्वदेशी असून त्यात कार्बन आणि केवलार फायबर, कॉम्पोझिट मटेरिअल आदींचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला आहे. त्याने ते हलके आणि टिकाऊ बनले आहे. हेलिकॉप्टरमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, रडार, वैमानिकाच्या हेल्मेटच्या काचेवर लक्ष्याची माहिती दिसून त्यावर नेम धरण्याची सुविधा (हेल्मेट पॉइंटिंग सिस्टीम) आदी प्रणाली बसवल्या आहेत. ध्रुवची मार्क-३ आवृत्ती ताशी कमाल २९२ किमी वेगाने ६३० किमीपर्यंत प्रवास करू शकते.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2018 1:02 am

Web Title: hal dhruv utility helicopter
Next Stories
1 तेजस लढाऊ विमान
2 एचएफ -२४ मरुत आणि अजित विमाने
3 अरिहंत अणुपाणबुडी
Just Now!
X