News Flash

माळीण दुर्घटनेतून धडा घेण्याचा मंडळांद्वारे संदेश

गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप बदलले आहे. देखाव्याच्या माध्यमातून भव्यता जपण्यासाठी मंडळांकडून वर्गणीच्या नावे बक्कळ पैसा संकलित केला जातो.

| September 6, 2014 02:39 am

 त्याचा विनियोग मग जल्लोषात उत्सव साजरा करण्यासाठी केला जातो. मात्र भपकेबाजपणाचा अवलंब न करता काही मंडळे संवेदनशीलतेचे दर्शन घडवितात. शहर परिसरात बोटावर मोजण्या इतक्याच काही मंडळांनी माळीण दुर्घटनेचा संदर्भ घेऊन जनजागृतीत दाखविलेली संवेदनशीलता त्याच धाटणीची आहे. या माध्यमातून संबंधितांनी सामाजिक प्रबोधनाचा वसा नेटाने चालविला आहे.
येथील रविवार कारंजावरील श्री शनैश्वर भक्त मंडळाच्या वतीने आजवर देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक  प्रश्नांवर भाष्य करण्यात येत आहे. बाप्पाप्रेमींनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा तसेच पर्यावरण संरक्षण करावे अशी साद मंडळाने घातली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर मानवी जीवनावर काय विपरीत परिणाम होतो यावर अगदी मोजक्या शब्दांत आणि चित्रांच्या माध्यमातून फलकांद्वारे प्रकाश टाकला आहे. मागील वर्षी उत्तराखंडमधील केदारनाथ येथे झालेला जलप्रकोप तर दुसऱ्या फलकावर पुणे येथील माळीण दुर्घटनेची माहिती देत तिसऱ्या फलकावर हे असेच सुरू राहिले तर सर्वनाश कसा अटळ आहे असा इशारा देत पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. गेल्या काही वर्षांत निसर्गनिर्मित काही घटनांमधून निसर्ग वेळोवेळी इशारा देत आहे. मात्र आपण त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत आहोत. याची जाणीव करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मंडळाचे पदाधिकारी विकी आहेर यांनी सांगितले. पवननगर परिसरातील श्रीरामनगर येथील जय मल्हार सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे यंदा आठवे वर्ष. मंडळाने सुरुवातीपासून देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे. हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या, पाणी बचत.. या प्रश्नांवर जनजागृती केली आहे. यंदा मंडळाने माळीण दुर्घटनेतून नागरिकांनी धडा घ्यावा, याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्या दुर्घटनेची भीषणता देखाव्याद्वारे सादर केली आहे. डोंगर-दऱ्या, कपारी फोडून आपण रस्ता तयार करतो. यामुळे नैसर्गिक संपत्तीची धूळदाण उडत आहे. या प्रश्नावर वेळीच सावध होणे गरजेचे असल्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
माळीण घटनेनंतर तज्ज्ञांनी मांडलेली मते, त्यावरील काही लेख यांचे ध्वनिमुद्रित संकलन करत गणेशभक्तांना ते ऐकविले जात असल्याचे पदाधिकारी नितीन माळी यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या सजावटीत भपकेबाज आणि भव्यतेला महत्त्व प्राप्त होत आहे. साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करता येऊ शकतो हे काही जण विसरून गेले आहेत. जनजागृतीची आस मनात ठेवत काम करणाऱ्या अशा काही मंडळांनी धरलेली ही वेगळी वाट महत्त्वपूर्ण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 2:39 am

Web Title: message by ganesh mandal to learn from malin landslide incident
Next Stories
1 बिया व वृक्ष संवर्धन कायद्याचा!
2 ढोल-ताशांचा गजर आणि थिरकणारी पावले..
3 बाप्पा.. पुन्हा माळीण दुर्घटना नको
Just Now!
X