लाखो भक्तांचा पाहुणचार घेण्यासाठी लाडक्या गणरायाचे आगमन होण्यास आता काही तास उरले असले तरी त्याच्या स्वागतासाठी अवघे सोलापूरकर उत्सूक आहेत. शहरात १२७१ तर जिल्हा ग्रामीणमध्ये सुमारे तीन हजार सार्वजनिक मंडळांतर्फे गणरायाच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणुका काढून प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्याची जय्यत रात्री उशिरापर्यंत चालूच होती.
शहरातील कोंतम चौक, कन्ना चौक, मधला मारूती, राजेंद्र चौक, विजापूर रोड परिसर आदी भागात गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवसापासूनच गणेशमूर्तीच्या खरेदीसाठी नागरिक व भक्तांची गर्दी उसळल्याचे दिसून येते. यंदा घरगुती स्वरूपात सुमारे दीडलाख गणपतींच्या मूर्तीची खरेदी अपेक्षित असून त्याचबरोबर मोठय़ा आकाराच्या किमान दहा हजार मूर्ती तयार आहेत. यापैकी बहुसंख्य मूर्ती शेजारच्या उस्मानाबाद, लातूर, विजापूर, गुलबर्गा, बागलकोट आदी भागातून मागणी नोंदविण्यात आली  आहे. तसेच हैदराबाद, चेन्नईसारख्या दूरच्या भागातही सोलापुरातून गणरायाच्या वैशिष्टय़पूर्ण मूर्ती रवाना झाल्या आहेत. पूर्व भागातील मूर्तिकारांनी घडविलेल्या गणरायाच्या मूर्तींना हैदराबादसह सिकंदराबाद, चेन्नई, बंगळुरूपर्यंत मागणी होती. रेल्वे स्थानकासमोर अनेक मूर्तिकारांनी गणरायाच्या मूर्तीची दालने उभारली असून त्याठिकाणी मध्यम आकाराच्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. महागाईचा फटका गणरायाच्या मूर्तीच्या खरेदीला बसणे साहजिकच होते. यंदा ५० रुपयांपासून ते २५ हजारांपर्यंत मूर्तीच्या किंमती आहेत.
मध्यवर्ती सार्वजनिक मंडळ, लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळ, पूर्व भाग, लष्कर विभाग, विजापूर रोड, विडी घरकूल आदी पाच प्रमुख मंडळांच्या अधिपत्याखाली १२७१ सार्वजनिक मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. तर जिल्हा ग्रामीणमध्ये २६६३ मंडळांमार्फत ‘श्री’ची प्रतिष्ठापना केली जात आहे. याशिवाय ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्य़ात ३५३ गावांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत ‘एक गाव- एक गणपती’च्या योजनेला प्रतिसाद घटत चालल्याचे दिसून येते. दोन वर्षांपूर्वी ही योजना ४७२ गावांमध्ये राबविण्यात आली होती. गतवर्षी त्यात घट होऊन ४१४ गावांमध्ये एक गाव एक गणपती योजनेला प्रतिसाद मिळाला होता, यंदाच्या वर्षी त्यात पुन्हा घट होऊन ३५३  गावांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. बार्शी व अक्कलकोट या दोन्ही संवेदनशील तालुक्यांमध्ये राज्य राखीव पोलिसांच्या तुकडय़ा पाठविण्यात येत आहेत. पोलीस अधीक्षक दत्तात्रेय मंडलीक यांच्या मार्गदर्शनाखाली ६ पोलीस उपअधीक्षक, १९ पोलीस निरीक्षक, ५६ फौजदार, १०५४ पोलीस कर्मचारी, ११०० गृहरक्षक जवानांचा बंदोबस्ताच्या नियोजनात समावेश आहे.
शहरात पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या देखरेखीखाली ३ पोलीस उपायुक्तांसह ७ सहायक आयुक्त, २४ पोलीस निरीक्षक, ६७ फौजदार, ७१४ पोलीस कर्मचारी, ३३ महिला पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त राहणार आहे. याशिवाय शहराबाहेरून ५ सहायक पोलीस आयुक्तांसह ५ पोलीस निरीक्षक, १० फौजदार, ७५ नवशिकाऊ पोलीस शिपाई, २५ नवशिकाऊ महिला पोलीस, ५०० गृहरक्षक जवान आणि राज्य राखीव पोलिसांची एक कंपनी याप्रमाणे बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
शहरात गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, अशी पर्यावरणप्रेमी नागरिकांतून मागणी होत आहे. गतवर्षांप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे बंधन घालण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी ही उपाययोजना स्वागतार्ह असल्याचे नागरिकांतून बोलले जाते. परंतु गणेश मंडळांनी सीसीटीव्हीचा खर्च परवडणारा नसल्याची तक्रारवजा ओरड कायम ठेवली आहे.
गणेसोत्सवाच्या खरेदीसाठी सांगलीत बाजारात गर्दी
शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाचे वेध सर्वानाच वेध लागले असताना सजावटीच्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी आज बाजारात मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांची मंडप उभारणीसाठी घाई सुरू असतानाच सांगली-मिरजेतील कांही घरगुती गणेशाचे आगमन धार्मिक वातावरणात करण्यात आले. सांगलीमध्ये कल्पद्रुम मंडळाच्या क्रीडांगणावर गणेश मूर्ती विक्रीसाठी यंदा खास जागा देण्यात आली आहे.
पावसाने समाधानकारक साथ दिल्याने यंदा गणेशाचे स्वागत करण्यासाठी आनंददायी वातावरण आहे. सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जोरदार उत्साह यंदा दिसून येत आहे. मंडळाचे काही कार्यकत्रे उत्सवासाठी लागणार्या विविध परवाने घेण्यासाठी हद्दीतील पोलीस ठाण्यात थांबून आहेत. प्रशासनानेही एक खिडकी योजनेअंतर्गत परवानगी देण्याचे धोरण अवलंबले आहे.
उत्सवासाठी लागणार्या साहित्याच्या खरेदीसाठी सांगलीमध्ये गणपतीपेठ, सिंधी मार्केट, दत्त मारूती रोड, बालाजी चौक, हरभट रोड, तानाजी चौक, विश्रामबाग, चांदणी चौक, कापडपेठ आदी ठिकाणी तर मिरज शहरात लक्ष्मी मार्केट, शनिवार पेठ, स्टेशन रोड, लोणी बाजार आदी ठिकाणी विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे.
गणपती पेठेत ठोक विक्री बरोबरच किरकोळ विक्रेतेही आहेत. सजावटीच्या साहित्यांना यंदाही चांगली मागणी असून विद्युत साहित्यांची विक्री करणार्या दुकानातून माळा खरेदी करण्यासाठी बाल गोपालांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आहे. सजावटीच्या साहित्यामध्ये चिनी बनावटीच्या वस्तू स्वस्त असल्याने ग्राहकांचा ओढा या साहित्यांकडे जास्त प्रमाणात दिसून येत आहे. यामध्ये विद्युत रोषणाई सोबतच प्लॅस्टिक पासून तयार करण्यात आलेली पाने, फुले यांचा समावेश आहे.