सुमधूर गीत-संगीताचा मिलाफ असलेली, मराठी आणि हिंदूीचे फ्यूजन असलेल्या श्रेयस-प्रीत जोडगोळीच्या स्वररचनांनी सिद्ध झालेल्या ‘श्री गणनायका’ या अल्बमचे प्रकाशन राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या हस्ते नुकतेच झाले. प्रतिमा फाउंडेशनच्या उषा देशपांडे, टाईम्स म्युझिकच्या वर्षां पौडवाल, विजय निकम, प्रदीप पानसांडे, अभिनेत्री मंगला केंकरे, अभिनेता पंकज विष्णू याप्रसंगी उपस्थित होते. या अल्बमची संकल्पना आणि गीते श्रेयस आंगणे यांची असून सुरेश वाडकर, सचिन खेडेकर, शंकर महादेवन, बेला शेंडे, सुहास सावंत यांच्यासह जावेद अली आणि कृष्णा ब्यौरा यांनी या गीतांना आवाज दिला आहे. गणरायावरील श्रद्धेतून निर्मिती झालेल्या या अल्बममधील रचना श्रोत्यांना भक्तिरसाचा आनंद देणाऱ्या आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेविषयी महत्त्वाच्या नोंदींवरही श्री गणनायका अल्बममध्ये सूचक भाष्य काव्यातून रंजक पद्धतीने सांगितले आहे.