मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सुमारे १४ हजार पोलीस तैनात करण्यात आली आहेत. गणेशोत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मोठय़ा सार्वजनिक गणेश मंडळांसह गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा आणि संवेदनशील ठिकाणी साध्या वेशातील गस्तीसोबतच सीसीटीव्ही कॅमेरे, टेहळणी मनोऱ्यांच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाणार आहे.

मुंबईतील प्रख्यात गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भक्त मोठय़ा प्रमाणात गर्दी करतात, तसेच प्रतिष्ठित व्यक्तीही या गणपतींच्या दर्शनासाठी येतात. गणेशोत्सव काळात खरेदीसाठी बाजारपेठाही गजबजलेल्या असतात. त्यामुळे अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. मेटल डिटेक्टर, श्वान पथक, बॉम्बशोधक व नाशक पथकांच्या माध्यमातूनही संवेदशील ठिकाणांची नियमित तपासणी करण्यात येत आहे.

हेही वाचा >>>कोकणच्या एसटी फेऱ्यांवर शिंदे पितापुत्रांची छाप; ठाणे विभागातून एक हजार बसगाडय़ांची नोंदणी

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती हे स्वत: सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख ठेवणार आहेत. मुंबई पोलीस दलातील साहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे मिळून २०२४ अधिकारी व ११ हजार ७२६ पोलीस अंमलदार बंदोबस्तात तैनात असतील. १५ उपायुक्त स्थानिक पातळीवर बंदोबस्तांचे नियोजन करणार आहेत. पोलिसांच्या दिमतीला केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या तुकडय़ा तैनात ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>>टिटवाळ्यातील श्री महागणपती हॉस्पिटल विस्ताराच्या वाटेवर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासगी बस, अवजड वाहनांबाबत विशेष नियोजन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता १९ ते २९ सप्टेंबर या कालावधीत सर्व प्रकारची अवजड वाहने आणि खासगी बस याबाबत वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. त्या अंतर्गत २१, २४, २६ व २९ सप्टेंबर या कालावधीत दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना आणि खासगी बस यांना प्रवेश करण्यास आणि चालविण्यास पूर्ण निर्बंध असतील. इतर दिवस सर्व अवजड वाहनांना दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर रात्री १२ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत वाहतुकीसाठी मुभा असेल.