News Flash

‘एकुलत्या एक’ मुलाच्या समस्या

‘एक मूल बरे, की दोन मुले तरी हवीतच’ हा होऊ घातलेल्या पालकांच्या नेहमीच्या वादाचा विषय असतो. पहिल्या मुलाच्या वेळचा आमचा अनुभव खूप छान होता,

| December 2, 2014 07:39 am

‘एक मूल बरे, की दोन मुले तरी हवीतच’ हा होऊ घातलेल्या पालकांच्या नेहमीच्या वादाचा विषय असतो. पहिल्या मुलाच्या वेळचा आमचा अनुभव खूप छान होता, आम्हाला पालक व्हायला आवडते म्हणून आणखी एखादे मूल झाले तर आवडेल हा दृष्टिकोन अगदी स्वागतार्ह आहे. पण ‘पहिल्या मुलाची वाढ चांगली व्हावी’ किंवा ‘एकाला दुसरे भावंड असलेले बरे असते’ या अपेक्षा मनात बाळगून दुसरे अपत्य होऊ देण्याचा निर्णय घ्यायची प्रक्रिया अवलंबून असेल तर मात्र पालकांनी खरोखरच थोडा अधिक विचार करणे गरजेचे आहे. भावंड असणे व नसणे याचा मुलाच्या वाढीवर फारसा परिणाम होत नाही हे इथे लक्षात घ्यायला हवे.
भावंड नसलेल्या मुलांच्या वागण्यातील बहुतेक समस्या त्याचे आई-वडील आणि घरातले इतर सदस्य त्यांच्याशी लहानपणापासून कसे वागतात यावर अवलंबून असतात. उत्तम कमावणारे आई-बाबा आणि त्यांचे एकुलते एक मूल हे कुटुंबाचे चित्र डोळ्यांसमोर आणा. ‘आमचा एकच घोडा रेसमध्ये उतरवला आहे’! ही या पालकांची भावना असते. आम्ही जितके ‘इनपुट’ देऊ त्या प्रमाणात ‘आऊटपुट’ मिळालेच पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असते. अशा परिस्थितीत मुलाने आयुष्यात प्रत्येक गोष्टीत पहिलेच यायला हवे ही अपेक्षा वाढीस लागते. या अपेक्षांच्या ओझ्याखाली ते लहानगे बिचारे दमून जाते. दोन्ही पालकांचे पालक- म्हणजे दोन्ही घरचे आजी- आजोबाही मुलाच्या दिमतीला असतील तर लहानपणापासून ही सहाही मंडळी हात धुऊन त्याच्या मागे लागतात. यात लहानपणापासून मुलाला प्रत्येक गोष्ट जिथल्या-तिथे दिली जाते, त्याला स्वत:हून काहीही करूच दिले जात नाही. त्याच्याकडे इतके ‘लक्ष’ दिले जाते की ‘लाडं लाडं झालं वेडं’ अशी त्याची अवस्था होते! यातून त्या एकटय़ा मुलाच्या हट्टीपणाला सुरुवात होते. प्रत्येक एकुलत्या मुलांचे पालक असेच वागतात, असे म्हणण्याचा उद्देश मुळीच नाही, पण एकटय़ा मुलांच्या पालकांचे सर्वसाधारण चित्र हेच दिसून येते.
प्रत्येक लहान मुलाच्या वाढीत त्याच्या सामाजिक जीवनाचा खूप मोठा वाटा असतो. समवयस्क मित्र-मैत्रिणींकडून मुले खूपसं शिकतात. त्यामुळे घरी एकटय़ा असलेल्या मुलांच्या बाबतीत हा सामाजिक जीवनाचा भाग अधिक निगुतीने जपावा लागतो. मुलांना भरपूर मित्र मिळू देणे आणि त्यांच्या मैत्रीत लक्ष न घालता ती टिकू देणे याची काळजी पालकांना घ्यावी लागते. नातेवाईक जपणे हीदेखील त्यातलीच एक गोष्ट. ‘आपले नातेवाईक फक्त आपले नसून आपल्या मुलाचेही ते नातेवाईक आहेत,’ हे कायम लक्षात ठेवून ते जपावे लागतात.
सतत पालकांवर अवलंबून राहण्याची सवय होणे, बरोबरीचे कुणीच न मिळाल्यामुळे एकलकोंडेपणा येणे, अतिलाड झाल्यामुळे हट्टीपणा वाढीस लागणे आणि पालकांच्या जास्त अपेक्षांमुळे सतत दडपण घेऊन जगणे या एकुलत्या मुलांच्या सर्रास दिसणाऱ्या समस्या. पालकांच्या वागणुकीतून सुरू होणाऱ्या या समस्यांचे उत्तरही पालकांकडेच आहे.
– डॉ. भूषण शुक्ल, बालमानसोपचारतज्ज्ञ.

(शब्दांकन- संपदा सोवनी)

‘एकुलत्या एक’ मुलाच्या पालकांसाठी-
ल्ल माणसात जगणे आणि माणसांना धरून राहणे हे माणूस असण्याचे पहिले लक्षण आहे. त्यामुळे ‘तिघांचे कुटुंब’ याचा अतिरेक न करता मुलाला समाजात मिसळण्याची संधी देणे गरजेचे.
ल्ल मूल लहान असले तरी त्याला कायम लहान बाळाप्रमाणे वागवणे टाळावे. शाळेत जाणाऱ्या मुलालाही बुटाच्या लेस बांधून देणे, त्याचे दप्तर पालकांनी वागवणे, जेवताना त्याला भरवणे अशा प्रत्येक दैनंदिन गोष्टीत पालकांनी मदत करणे टाळावे.
ल्ल मूल म्हणजे ‘शेअर मार्केट’ नव्हे! एकटय़ा मुलावर आम्ही जितके ‘रीसोर्सेस’ लावू तितके ‘आऊटपुट’ मिळालेच पाहिजे असा विचार नको.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2014 7:39 am

Web Title: problems of singal child
टॅग : Health It,Loksatta
Next Stories
1 कॅन्सर आणि आयुर्वेद: नस्य चिकित्सा
2 व्यायाम करा नेमाने!
3 वमन व विरेचन चिकित्सा
Just Now!
X