आयपीएल ट्वेंटी-२० स्पध्रेत बुधवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ए बी डी’व्हिलियर्सच्या फटकेबाजीनंतर युवा खेळाडू सर्फराज खानने चौकार-षटकारांची आतषबाजी करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ७ बाद २०० धावांचा पल्ला गाठून दिला. डी’व्हिलियर्सने ४५ चेंडूंत ५७ धावांची खेळी करून बंगळुरूच्या धावांचा पाया रचला. सर्फराजने २१ चेंडूंत ४५ धावा चोपल्या आणि राजस्थान रॉयल्ससमोर २०१ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, डावाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावत क्रिकेटरसिकांना तिष्ठत ठेवले. अखेरीस पावसाने विश्रांती न घेतल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सलामीवर ख्रिस गेल (१०) आणि विराट कोहली (१) हे धावफलकावर १९ धावा असतानाच माघारी परतले. टीम साऊदीने पहिल्याच षटकात कोहलीला बाद केले आणि त्यानंतर पुढच्या षटकात गेललाही त्याने माघारी धाडले. मात्र, डी’व्हिलियर्सने संयमी खेळ करताना संघाला सुस्थितीत आणले.
डी’व्हिलियर्सने मनदीप सिंगसह तिसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. पाचव्या षटकात डी’व्हिलियर्सने जेम्स फॉकनरला सलग तीन चौकार लगावून बंगळुरूची धावगती वाढवली. ही गती रोखण्यासाठी आलेल्या प्रवीण तांबेचा डी’व्हिलियर्सने समाचार घेतला. दुसऱ्या बाजूने मनदीप आपली भूमिका चोख बजावत होता. मात्र, मनदीला स्टुअर्ट बिन्नीने पायचीत करून ही जोडी तोडली. डी’व्हिलियर्सने खणखणीत षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. दिनेश कार्तिकसोबत झालेल्या गैरसमजामुळे डी’व्हिलियर्स धावबाद झाला. कार्तिकही   (२७) माघारी परतला. डी’व्हिलियर्सची ही खेळी मात्र सर्फराजच्या तडाखेबाज खेळीने झाकोळली. सर्फराजने शेन वॉटसन, तांबे, धवल कुलकर्णी यांच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत राजस्थानला दोनशेचा पल्ला गाठून दिला. सर्फराजने २१ चेंडूंत १ षटकार व ६ चौकाराच्या मदतीने नाबाद ४५ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : ७ बाद २०० (ए बी डी’व्हिलियर्स ५७, मनदीप सिंग २७, दिनेश कार्तिक २७, सर्फराज खान नाबाद ४५; टीम साऊदी २/३२)