आयपीएलमधल्या महागडया खेळाडूंपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने यंदाच्या आयपीएलमध्ये फ्रेंचायजीची साफ निराशा केली आहे. जानेवारीमध्ये पार पडलेल्या लिलावाच्यावेळी दिल्ली डेअरडेव्हिल्सने तब्बल ९ कोटी रुपये मोजून ग्लेन मॅक्सवेलला विकत घेतले होते.

पण मॅक्सवेल या सीझनमध्ये सुपरफ्लॉप ठरला. त्याने १२ डावात मिळून फक्त १६९ धावा केल्या तसेच गोलंदाजीमध्येही तो विशेष चमक दाखवू शकला नाही. १२ पैकी सहा डावात त्याला दोन आकडी धावसंख्याही करता आला नाही. लांब षटकार खेचण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने १२ सामन्यात फक्त नऊ षटकार खेचले आणि चौदा चौकार लगावले. गोलंदाजीमध्ये १२ सामन्यात १४ ओव्हर टाकताना २० च्या सरासरीने पाच विकेट काढल्या.

याआधी मॅक्सवेल तीनवर्ष किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला. पण प्रत्येकवेळी मॅक्सवेल बेजबाबदार फटके खेळून बाद व्हायचा असे पंजाबचा मार्गदर्शक असलेल्या विरेंद्र सेहवागने समालोचन करताना सांगितले होते.

मॅक्सवेलच्या या खराब फॉर्ममागे ऋषभ पंतची दमदार कामगिरी सुद्धा एक कारण आहे असे मत रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केले. डेअरडेव्हिल्सच्या सलामीच्या सामन्याच्यावेळी मॅक्सवेल एरॉन फिंचच्या लग्नाला गेला होता. त्यामुळे तो या सामन्यात खेळला नाही. आम्ही मॅक्सवेलला चौथ्या स्थानावर खेळवणार होतो. पण मॅक्सवेलच्या अनुपस्थितीत आम्ही ऋषभ पंतला संधी दिली.

त्या सामन्यात ऋषभने चांगली कामगिरी केली. त्यानंतर प्रत्येक सामन्यात ऋषभ पंतच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. ऋषभचा इतका चांगला खेळ पाहून त्याला जास्त दु:ख झाले. एक प्रकारे ऋषभ पंतमुळे ग्लेन मॅक्सवेल झाकोळला गेला असे पाँटिंगने सांगितले.