आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रविवारी प्ले-ऑफ फेरीचे चित्र स्पष्ट झाले. दिल्लीने मुंबईला पराभूत करून बाहेरचा रस्ता दाखवला. तर चेन्नईने पंजाबला स्पर्धेबाहेर ढकलले. मुंबई आणि पंजाब पराभूत झाल्याने राजस्थानच्या संघाला प्ले-ऑफ फेरीत स्थान मिळाले आणि बाद फेरीत त्यांची लढत कोलकाताशी होणार आहे.

प्ले-ऑफ फेरीतील सामन्यांना आज सुरुवात होणार आहे. आज २२ मे रोजी हैदराबाद आणि चेन्नई यांच्यात पहिली पात्रता फेरी होणार आहे. या सामन्यातील पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार असून कोलकाता आणि राजस्थान यांच्यातील विजेत्या संघाशी त्यांना दोन हात करता येणार आहेत.

त्यापैकी पहिला सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हैदराबाद आणि चेन्नई यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघ साखळी फेरीत १४ सामन्यांपैकी ९ सामने जिंकून १८ गुणांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत. दोन्ही संघ अंतिम फेरी गाठण्यासाठी मैदानात कसून सराव करत आहेत. मात्र, आज नियोजित असलेला हैदराबाद- चेन्नई पहिला पात्रता फेरी सामना काही कारणाने रद्द झाला तर?

हा सामना मुंबईत होणार असून सामन्याची वेळ सांयकाळी ७ची आहे. मुंबईतील वातावरण पाहता तेथे पाऊस पडण्याची शक्यता अगदी कमी आहे. मात्र जर काही अपरिहार्य कारणामुळे हा सामना रद्द झाला तर आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलकडे यावर पर्याय आहे. साखळी फेरीच्या दोनही सामन्यात चेन्नईने हैदराबादला पराभूत केले होते. पण असे असले तरी हैदराबाद संघाने जास्त नेट रन रेटच्या जोरावर साखळी फेरीत अव्वल स्थान पटकावले होते. त्यामुळे सामना रद्द झालाच, तर नियमानुसार या नेट रन रेटच्या जोरावर हैदराबादच्या संघाला थेट अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. आणि चेन्नईच्या संघाला बाद फेरीतील विजेत्या संघाशी झुंजावे लागेल.