Dream 11 IPL 2020: दुबईच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात सुपरओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली. विजयासाठी मिळालेले अवघ्या ३ धावांचं आव्हान दिल्लीने सहज पूर्ण केलं. मार्कस स्टॉयनीसच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या बळावर दिल्लीने १५७ धावा केल्या होत्या. स्टॉयनीसनेच गोलंदाजी करताना शेवटच्या षटकात दोन महत्त्वपूर्ण बळी घेतले आणि सामना सुपरओव्हरपर्यंत नेण्यात मोलाचा वाटा उचलला. निर्धारित २० षटकात पंजाबकडून मयंक अग्रवालने धडाकेबाज खेळी केली. त्याने ८९ धावा केल्या, पण सुपरओव्हरमध्ये त्याला संधी न दिल्यामुळे सर्वच स्तरातून पंजाब नेतृत्वावर टीका करण्यात आली. लोकेश राहुल आणि पंजाब संघ व्यवस्थापनाने दमदार खेळी करणाऱ्या मयंक अग्रवालला सुपरओव्हरमध्ये संधी का दिली नाही? असा संतप्त सवाल नेटिझन्सने केला.

पाहू या काही निवडक ट्विट्स-

त्याआधी प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाचे पहिले ३ गडी झटपट बाद झाले. पृथ्वी शॉसोबत चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात झालेल्या गोंधळामुळे शिखर धवन माघारी परतला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सलामीवीर पृथ्वी शॉ देखील ५ धावा काढून बाद झाला. तर पाठोपाठ शिमरॉन हेटमायरही ७ धावा काढून बाद झाला. त्यामुळे दिल्लीची अवस्था ३ बाद २२ होती. त्यानंतर ऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. अय्यरने ३ षटकारांसह ३२ चेंडूत ३९ धावा तर ऋषभ पंतने २९ चेंडूत ३१ धावा केल्या. ते दोघेही बाद झाल्यावर अखेर स्टॉयनिसने फटकेबाजी करत २० चेंडूत अर्धशतक ठोकलं आणि संघाला १५०पार पोहोचवलं.

या आव्हानाचा पाठलाग करताना लोकेश राहुलने दमदार सुरूवात केली होती. पण तो २१ धावांवर बाद झाला. पाठोपाठ करूण नायर, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, सर्फराज खान, कृष्णप्पा गौतम सारे झटपट बाद झाले. मयंक अग्रवालने ८९ धावांची बहारदार खेळी एकहाती सामना खेचून आणला पण स्टॉयनीसने अखेरच्या षटकात दोन बळी घेत सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. त्यानंतर झालेल्या सुपरओव्हरमध्ये रबाडाने राहुल (२) आणि पूरनला (०) माघारी धाडले. त्यानंतर दिल्लीकडून पंतने आवश्यक धावा काढल्या.