News Flash

पुणे विद्यापीठाचे गुणदान प्रकरण दडपण्यासाठी दबाव?

पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे गुण वाढवून देण्याचा घोटाळा किमान १५ वर्षे जुना असून, त्याची पाळेमुळे आणखी खोलवर असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आतापर्यंत अटक झालेले

| January 15, 2013 02:20 am

पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे गुण वाढवून देण्याचा घोटाळा किमान १५ वर्षे जुना असून, त्याची पाळेमुळे आणखी खोलवर असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आतापर्यंत अटक झालेले उपकुलसचिव लालसिंग वसावे आणि सहायक कुलसचिव डॉ. राजेंद्र पंडित यांच्याही पुढे हे प्रकरण जाणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अडकलेल्या आपापल्या माणसांना वाचविण्यासाठी विविध मार्गानी दबाव येऊ लागला आहे. इतक्या मोठय़ा प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षकाऐवजी शहर गुन्हे अन्वेषण शाखेकडे का देण्यात येत नाही, याबाबतही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
पुणे विद्यापीठात पुनर्मूल्यांकनाच्या वेळी विद्यार्थ्यांचे गुण वाढविण्यात येत असल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. मुख्यत: परदेशी विद्यार्थ्यांना हेरून त्यांचे गुण वाढविण्यासाठी हजारो रुपये उकळले जात असल्याचे त्यातून बाहेर आले आहे. आतापर्यंत पोलीस तपासात उपकुलसचिव वसावे आणि सहायक कुलसचिव पंडित यांच्यासह सातजणांना शनिवारी अटक करण्यात आली. विशेष म्हणजे डॉ. पंडित हे विद्यापीठाने स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीचे सदस्य होते.
विद्यापीठातील सूत्रांनी व तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ ला दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नुकतेच उघड झाले असले तरी ते गेल्या १०-१५ वर्षांपासून सुरूच आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी राजकीय दबावसुद्धा येऊ लागला आहे. आपापल्या माणसांना वाचविण्यासाठी विविध माध्यमांतून धडपड सुरू आहे. त्यासाठी आंदोलन करण्याच्या व बहिष्कार घालण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. हे प्रकरण केवळ उपकुलसचिवांपर्यंत थांबलेले नाही, तर त्याची पाळेमुळे आणखी वरिष्ठ पातळीपर्यंत जात आहेत. त्यामुळेच या प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला पेलवणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. विशेष म्हणजे त्याची व्याप्ती पाहता तो शहर गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिला जात नाही, याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

पुणे विद्यापीठाच्या पदव्याच विक्रीला
‘ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट’ वगैरे विशेषणे लावण्यात येणाऱ्या पुणे विद्यापीठातील या प्रकरणामुळे आता ‘येथे विद्यापीठाच्या पदव्या विकत मिळतील’ असा फलक लावण्याची वेळ आली आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया काही प्राध्यापकांनी व्यक्त केली. ओमान व इतर देशांचे अनेक विद्यार्थी पैशांच्या जोरावर विद्यापीठाच्या पदव्या मिळवत आहेत. हे थांबले नाही तर पुणे विद्यापीठाच्या पदव्यांना किंमत राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 2:20 am

Web Title: pressure for hide mark distribution scam in pune university
Next Stories
1 बीडच्या आदित्य दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आज धरणे
2 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील नेमणुकांमध्ये वशिलेबाजीला ऊत
3 अंतिम उत्तरे ठरविण्याचा अधिकार एमपीएससीच्या विषयतज्ज्ञ समितीलाच
Just Now!
X