08 March 2021

News Flash

पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया

मागील भागात आपण पसंतीक्रमाविषयी प्राथमिक चर्चा केली. आता प्रत्यक्ष पसंतीक्रम कसे भरायचे ते पाहू. शक्यतो एकाच शाखेची निवड करावी.

| June 7, 2015 05:27 am

मागील भागात आपण पसंतीक्रमाविषयी प्राथमिक चर्चा केली. आता प्रत्यक्ष पसंतीक्रम कसे भरायचे ते पाहू. शक्यतो एकाच शाखेची निवड करावी. परंतु उदाहरणादाखल आपण दोन शाखांची निवड करू, जेणेकरून हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. आपण विज्ञान आणि वाणिज्य या दोन शाखा निवडू. या शाखेतील द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाचे प्रवेश ‘ऑनलाइन’ माध्यमातून होणार नाहीत.
‘लॉग इन’ करून पसंतीक्रमाचा भाग उघडल्यानंतर संगणकातील बाण ‘विज्ञान’च्या चौकोनावर नेऊन ‘क्लिक’ करा. नंतर तोच बाण ‘वाणिज्य’च्या चौकोनावर नेऊन परत ‘क्लिक’ करा. आता तुमच्यासमोर पसंतीक्रमाच्या भागातील पहिला उपविभाग दिसेल. (माहिती पुस्तिकेतील अनुक्रमांक ३) या भागात आपल्याला आपल्या पसंतीच्या किमान १५ व कमाल ३० महाविद्यालयांचे कोड क्रमांक भरावयाचे आहेत. या महाविद्यालयांच्या निवडीसाठी संपूर्ण एमएमआर (मुंबई महानगर प्रदेश) उपलब्ध आहे. पसंतीक्रम उतरत्या श्रेणीने भरावयाचे आहेत. म्हणजे ज्या महाविद्यालयामध्ये आपल्याला प्रवेश हवाच आहे त्याचा कोड क्रमांक सर्वप्रथम भरावयाचा, ते न मिळाल्यास पुढचा याप्रमाणे पसंतीक्रम भरावे. कोणत्या शाखेच्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक अग्रक्रमाने भरायचा ही सर्वस्वी वैयक्तिक बाब आहे. येथे अट अशी की, आपल्या पसंतीक्रमात आपण निवडलेल्या प्रत्येक शाखेचे किमान एक तरी महाविद्यालय असणे आवश्यक आहे.
पसंतीक्रमानुसार कोड क्रमांक भरताना जर एखाद्या महाविद्यालयाचा कोड दोनदा भरला गेला तर संगणक आपणास अशी द्विरुक्ती रद्द करण्याची सूचना देईल व ती रद्द करेपर्यंत आपणास पुढे जाऊ देणार नाही. तसेच फक्त मुलांसाठीच्या महाविद्यालयाचा कोड मुलीने अथवा फक्त मुलींसाठीच्या महाविद्यालयाचा कोड मुलाने भरल्यास अशी पसंती रद्द करेपर्यंत संगणक आपणास पुढे जाऊ देणार नाही. आपण दिलेल्या पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये आपल्या प्रवर्गासाठी मागील वर्षीचा ‘कटऑफ’ आपणास मिळालेल्या गुणाहूंन ५ टक्क्यांहून अधिक असेल तर संगणक आपणास सावध करील व ‘शक्यतो अशा महाविद्यालयाचा पसंतीक्रमात समावेश करू नये, तेथे प्रवेश मिळण्याची शक्यता नाही’ अशी सूचना देईल. अर्थात, या सूचनेचा स्वीकार करावा अथवा कसे ही सर्वस्वी वैयक्तिक बाब आहे. त्याबद्दल संगणक आग्रही असणार नाही. अशा तऱ्हेने पहिला उपविभाग भरल्यावर प्रथम ‘कन्फर्म’ व नंतर ‘ओके’ बटणावर ‘क्लिक’ करून हा टप्पा पूर्ण होईल.
दुसऱ्या उपविभागात (माहिती पुस्तिकेतील अनुक्रमांक ४) आपणाला ‘एमएमआर’मधील अकरापैकी कोणताही एक ‘झोन’ निवडायचा आहे. या उपविभागात ‘झोन’ची निवड केल्यावर निवडलेल्या ‘झोन’बाहेरील महाविद्यालय निवडता येणार नाही. त्यासाठी ‘झोन’ची निवड काळजीपूर्वक करावी. आपल्या पसंतीची जास्तीत जास्त महाविद्यालये असतील असा ‘झोन’ शक्यतो निवडावा. पण येथे कोणतीही सक्ती नाही, ही सर्वस्वी वैयक्तिक पसंतीची बाब आहे.
‘झोन’ची निवड केल्यावर या उपविभागात आपल्याला किमान १५ व कमाल २० महाविद्यालयांची निवड करावयाची आहे. आपल्या पसंतीक्रमात आपण निवडलेल्या प्रत्येक शाखेचे किमान एक तरी महाविद्यालय असणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी (याच अथवा याआधीच्या उपविभागात) मागितलेल्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक पुन्हा भरता येणार नाही, अशी अट येथेही आहे. अशा तऱ्हेने दुसरा उपविभाग भरल्यावर प्रथम ‘कन्फर्म’ व नंतर ‘ओके’ बटणावर ‘क्लिक’ करून हा टप्पा पूर्ण होईल.
तिसऱ्या उपविभागात (माहिती पुस्तिकेतील अनुक्रमांक ५) आपणाला पूर्वी निवडलेल्या ‘झोन’मधील कोणतेही दोन ‘वॉर्ड’ निवडायचे आहेत. या उपविभागात दोन ‘ड्रॉप बॉक्सेस’ दिसतील. त्यावर ‘क्लिक’ केल्यावर आपण मागे निवडलेल्या ‘झोन’मधील ‘वॉर्ड’ची यादी दिसेल. प्रत्येक ‘ड्रॉप बॉक्स’मधून फक्त एका ‘वॉर्ड’ची निवड करावयाची आहे, अर्थात एकच ‘वॉर्ड’ दोनदा निवडता येणार नाही.
‘वॉर्ड’ची निवड झाल्यावर या उपविभागात आपल्याला फक्त शाळेशी संलग्न असलेल्या किमान ५ व कमाल १० महाविद्यालयांची निवड करावयाची आहे. आपल्या पसंतीक्रमात आपण निवडलेल्या प्रत्येक शाखेचे किमान एक तरी शाळेशी संलग्न महाविद्यालय असणे आवश्यक आहे, तसेच यापूर्वी (याच अथवा या आधीच्या उपविभागात) मागितलेल्या महाविद्यालयाचा कोड क्रमांक परत भरता येणार नाही, अशी अट येथे आहे.
ज्या कोणत्या महाविद्यालयामध्ये आपल्याला सर्वप्रथम प्रवेश जाहीर होईल, तिथे आपल्याला प्रवेश घ्यावाच लागेल, मग ते आपण निवडलेल्या दोनपैकी कोणत्याही शाखेचे असो, वा कोणत्याही क्रमांकावर असो. प्रवेश न घेतल्यास आपले नाव ऑनलाइनच्या प्रक्रियेतून वगळले जाईल.
अशा तऱ्हेने पसंतीक्रम भरल्यावर प्रथम ‘कन्फर्म’ व नंतर ‘ओके’ बटनावर ‘क्लिक’ करून हा टप्पा पूर्ण होईल व त्यानंतर ‘सबमिट’ बटणावर ‘क्लिक’ केल्यावर आपला प्रवेश अर्ज भरून सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. जोपर्यंत ‘सबमिट’ बटणावर ‘क्लिक’ करीत नाही तोपर्यंत आपला प्रवेश अर्ज ऑनलाइन प्रक्रियेत सामील होणार नाही, हे लक्षात ठेवा.
यानंतर संपूर्ण प्रवेश अर्ज (भाग १ व भाग २) ‘प्रिंट’ बटणावर ‘क्लिक’ करून छापून घेता येईल. जर प्रत्येक उपविभागात आपण किमान संख्येचे पसंतीक्रम दिले असतील तर आपण दिलेले पसंतीक्रम १ ते ३५ (उपविभाग पहिला १ ते १५, उपविभाग दुसरा १६ ते ३० व उपविभाग तिसरा ३१ ते ३५) याप्रमाणे आपणास दिसतील.
दोन शाखांची निवड केल्यास पहिल्या वेळी विज्ञान तर ‘बेटरमेंट’मुळे वाणिज्य (अथवा याउलट) अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्याला कोणताही इलाज नाही. म्हणून शक्यतो एकाच शाखेची निवड करावी. अर्थात ‘बेटरमेंट’ची संधी आपण नाकारू शकतो. पण एकदा ‘बेटरमेंट’ची संधी मिळाल्यावर ती स्वीकारली अथवा नाकारली, तरी दुसरी संधी मिळणार नाही. (समाप्त)
(लेखक २०१५च्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या कोअर व कार्यकारी समितीचे सदस्य आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2015 5:27 am

Web Title: process for entering choices for college
Next Stories
1 सर्वाधिक शाळांचा मान ठाणे जिल्ह्य़ाला
2 ‘बाजारपेठेवर आधारित अभ्यासक्रम चालवा’
3 चेन्नईतील शाळा प्रशासनाविरुद्ध पालक, शिक्षकांचे आंदोलन
Just Now!
X