क्रेडिट पद्धती राबविणारे पहिले विद्यापीठ, असा टेंभा मुंबई विद्यापीठ मिरवित असले तरी सखोल विचार न करता व शिक्षकांना विश्वासात न घेता विद्यार्थी व प्राध्यापकांच्या माथी मारण्यात आलेल्या क्रेडिट पद्धतीचा बोजवाराच उडाल्याचे चित्र आहे. त्यामुळे, महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येणाऱ्या या मूल्यांकन पद्धतीत दुसऱ्यांदा महत्त्वपूर्ण बदल करण्याची नामुष्की मुंबई विद्यापीठावर ओढवली आहे.
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने या शिफारसी केल्या असून त्या संबंधातील अहवाल लवकरच विद्वत् परिषदेपुढे मांडण्यात येणार आहे. विद्वत परिषदेच्या मान्यतेनंतर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेपुढे हा अहवाल चर्चेसाठी येईल. परिषदेने या अहवालाला मान्यता दिल्यानंतर जून, २०१४पासून नव्या पद्धतीनुसार अंतर्गत मूल्यांकन करण्यात येईल, असे या आढावा समितीचे एक सदस्य विजय पवार यांनी सांगितले.
क्रेडिट पद्धतीत सध्या ६० लेखी (मुख्य) आणि ४० अंतर्गत मूल्यांकन अशी गुणांची विभागणी केली जाते. अंतर्गत मूल्यांकनात २० गुण चाचणी परीक्षेचे, १० विद्यार्थी सहभाग आणि हजेरीचे आणि १० असाईनमेंटचे अशी विभागणी होती. परंतु, याचा फायदा घेत अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनात भरमसाठ गुण देत आपला निकाल फुगविला. त्यावर उपाय म्हणून विद्यापीठाने लेखी परीक्षेच्या प्रमाणात अंतर्गत मूल्यांकनाचे गुण कमी करणारी ‘स्केलिंग डाऊन’ ही पद्धती आणली. परंतु, प्राध्यापकांनी स्केलिंग डाऊनला विरोध केला. त्याऐवजी अंतर्गत मूल्यांकनाचे गुण कमी करण्यात यावेत, अशी मागणी ‘बुक्टू’ या प्राध्यापकांच्या संघटनेने दीड वर्षांपूर्वी केली. मात्र, तेव्हा विद्यापीठाने या मागणीची बिलकुल दखल घेतली नाही. पुढे स्केलिंग डाऊन केल्यानंतरही क्रेडिट पद्धतीमुळे होणारे गोंधळ आटोक्यात येत नसल्याचे विद्यापीठाच्या लक्षात आले. त्यामुळे, विद्यापीठाने पुन्हा एकदा क्रेडिट पद्धतीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला.
प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र समितीच्या शिफारसी
* अंतर्गत मुल्यांकनाचे गुण ४० वरून २५ वर आणण्यात यावेत.
*‘असाईनमेंट’ हा प्रकार रद्द करून केवळ चाचण्या आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यांच्या आधारे अंतर्गत मूल्यांकनाचे गुण निश्चित केले जावेत.
* अनुत्तीर्ण व गैरहजर विद्यार्थ्यांना आपला निकाल सुधारण्यासाठी देण्यात येणारी परीक्षेची दुसरी संधीही वर्षांच्या शेवटी एकत्रितपणे दिली जावी. (आतापर्यंत ही संधी प्रत्येक सत्र संपल्यानंतर १५ दिवसात परीक्षा घेऊन दिली जात असे.)