दयानंद लिपारे

फेब्रुवारीअखेर ९० कारखाने सुरू ; ४५ लाख टन उसाचे गाळप

गतवर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या प्रलयंकारी महापुरामुळे यंदाच्या हंगामात उसाचे उत्पादन सुमारे ३५ ते ४० टक्के घटणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण फेब्रुवारी महिना संपत आला तरी अजूनही राज्यातील ९० साखर  कारखान्यांचा गाळप सुरु असून आजवर ४५ लाख टन उसाचे गाळप होऊन सुमारे ५० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. मागील हंगामात १०७ लाख टन साखरेचे गाळप झाले होते ते यंदा ७० लाख टनावर जाईल असे चित्र निर्माण झाले आहे. महापुरामुळे उसाला मोठा फटका बसण्याची शक्यता यामुळे मागे पडली आहे.

चालू हंगाम सुरू होताना प्रारंभी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्राची नोंदणी साडे आठ लाख हजार हेक्टर झाल्याने यंदा लागवडीत घट झाल्याचे लक्षात आले होते. त्यातच पुन्हा ऑगस्टमध्ये महापुराचा फटका बसल्याने यंदा ऊस गाळप आणि साखर उत्पादनात मोठी घट होणार असा अंदाज व्यक्त केला गेला. त्यातून साखरेचे उत्पादन ६० लाख टनापर्यंत घसरण्याचा (सुमारे ३० टक्के घट) अंदाज आणि भीती अभ्यासकांनी वर्तवली होती.

ऑगस्ट महिन्यातील महापुरामुळे उसाचे नुकसान होऊन उत्पादनात घट होणार असल्याचा अहवाल कोल्हापूर साखर विभागाने पुणे आयुक्त कार्यालयाकडे नोव्हेंबर महिन्यात पाठवला होता. कोल्हापूर विभागात कोल्हापूर व सांगली हे दोन जिल्हे असून येथे सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यामुळे उसाचे उत्पादन घटणार असल्याचे अहवालात म्हटले होते. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यत ५३ हजार, तर सांगली जिल्ह्यत १८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.

अपेक्षेपेक्षा चांगले उत्पादन

महापुरात उसाचे पीक अनेक दिवस पाण्याखाली गेल्यामुळे ६२ लाख टन साखर उत्पादन होईल असा अंदाज होता. हा हंगाम दोन ते तीन महिने कसाबसा चालेल अशी शक्यता वर्तवली होती. आता चार महिने सरले तरी राज्यातील १४५ पैकी ९० साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. पुणे साखर आयुक्तालयाच्या २७ फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार ४५ लाख टन उसाचे गाळप झाले असून ४९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. त्यामुळे  यंदा उसाचे गाळप ७० लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे.

वातावरणाचा तोटा आणि लाभ

‘कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे या चार जिल्ह्यतच सुमारे ५० टक्के उसाचे उत्पादन होते. महापुराचा मोठा फटका बसल्यामुळे ३० टक्के उसाचे उत्पादन घटणार अशी भीती व्यक्त केली गेली होती. मात्र अजूनही हंगाम सुरू असल्याचे पाहता अपेक्षेपेक्षा अधिक गाळप झाले आहे. महापुरानंतर चांगले वातावरण निर्माण झाल्याने उसाचे उत्पादन वाढले. त्याचे वजन व उतारा वाढल्याने ते शेतकरी व कारखाने यांच्यासाठी लाभदायक ठरले.

– विजय औताडे, साखर अभ्यासक