कोल्हापूर महापालिकेत आम्ही विरोधात बसणार असल्याचे सांगत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी महापौर निवडीच्या स्पध्रेतून ‘यू टर्न’ घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले. कसलाही घोडेबाजार न करता महापौरपदाची निवडणूक होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापौर निवडीसाठी १६ नोव्हेंबर रोजी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप-ताराराणी आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही महापौर निवडीमध्ये चमत्कार होईल, असे विधान पालकमंत्री पाटील यांनी वारंवार केल्याने महापौर निवडीच्या राजकारणाला गती मिळाली होती. त्यावरून तर्कवितर्क व्यक्त केले जात होते, मात्र त्याला आज पालकमंत्र्यांनीच पूर्णविराम दिला.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी भाजप-ताराराणी आघाडी, शिवसेना व एक अपक्ष असे ३७ संख्याबळ होत आहे. महापौर निवडीसाठी ४१ मतांची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे झाले होते. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने आम्ही विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली आहे. प्रबळ विरोधक म्हणून महापालिकेत कामगिरी बजावताना चुकीच्या धोरणांना धारेवर धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौर निवडणुकीसाठी आमचा उमेदवाराचा अर्ज कायम राहणार आहे, असे म्हणत त्यांनी निवडणूक लढविण्याचे संकेत स्पष्टपणे दिले. केंद्र, राज्य व स्थानिक पातळीवर एकच सत्ता असेल तर विकासाला गती येते, असे सांगत त्यांनी आम्ही घोडेबाजार करणार नाही. पण विवेकबुद्धीला स्मरून भाजपचा महापौर होण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.
निवड बिनविरोध व्हावी
पालकमंत्र्यांच्या घोडेबाजार न करता निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचे स्वागत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केले. महापालिकेतील सौहार्दाचे वातावरण यामुळे टिकून राहण्यास मदत होईल. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याचबरोबर कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांसमवेत बठकीचे आयोजन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.