राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांची सूचना
कोल्हापूर दक्षिण बरोबरच शहर (उत्तर) विधानसभा मतदारसंघात डी. वाय. पाटील घराण्याने लक्ष घालण्याचे आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी शहर मतदारसंघातून आमदार निवडून आणावा, अशी सूचना एका कार्यक्रमावेळी केली .
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कसबा बावडय़ातील जिल्हा बँकेच्या एटीएमचे उद्घाटन बिहारचे माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांनी केले. यावेळी अध्यक्षीय भाषणात मुश्रीफ यांनी बँकेच्या कामाची माहिती देतानाच राजकीय टिपणी केली. ते म्हणाले की, जिल्हा बँकेकडून तालुक्याच्या ठिकाणी व प्रमुख गावांत ३४ एटीएम सेंटर सुरू करण्यात येत आहेत. मार्च २०१८ अखेर ६ हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट आहे.
डॉ. डी.वाय. पाटील यांचे गाव कसबा बावडा. आता ते उपनगर बनले असून येथे डॉ. डी. वाय. पाटील, त्यांचे सुपुत्र, आमदार सतेज पाटील यांचे वर्चस्व आहे. हा भाग शहर विधानसभा मतदारसंघात येतो. येथे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर सलग दोन वेळा निवडून आले आहेत.
सतेज यांचे बंधू संजय पाटील यांचे सुपुत्र ऋतुराज पाटील यांनी शहर मतदारसंघातून चाचपणी चालवली आहे. या पाश्र्वभूमीवर मुश्रीफ यांनी पाटील घराण्याला येथून निवडणूक लढवा, असे सूचित करत आपला पािठबाही व्यक्त केला.
मुश्रीफ म्हणाले, पाटील घराण्याच्या सोबत कसबा बावडय़ाची ताकद आहे. समस्त बावडेकरांनी जर मनात आणले तर शहर विधानसभा मतदारसंघातूनही बावडय़ाचा आमदार होऊ शकतो. त्यांचे हे वक्तव्य आगामी विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ-पाटील यांची राजकीय मत्री अधिकच दृढ करणारी असल्याचा प्रत्यय यावेळी आला.
यावेळी डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, प्रा. संजय मंडलिक, बँकेचे व्यवस्थापक प्रतापसिंघ चव्हाण, श्रीराम संस्थेचे सभापती प्रमोद पाटील, आर. के. पोवार, भय्या माने, विलास गाताडे, सर्जेराव पाटील-पेरीडकर, मोहन सालपे उपस्थित होते.