पिवळय़ा रंगासाठी रसायनांचे वाढते मिश्रण धोकादायक

कोल्हापूर म्हटले की ओठावर नाव येते ते चवदार गुळाचे. या गुळाचा गोडवा चाखण्यापूर्वी आता चोखंदळ खवय्याने थोडी पारख करून मगच त्याची चव घ्यावी. कारण कोल्हापुरी गुळात भेसळीचे प्रमाण वाढत चालल्याने व गुणवत्ता खालावली असल्याने देशभरातील बाजारात कोल्हापूरच्या गुळाचे नाव बदनाम होत आहे. भौगोलिक उपदर्श (जिऑग्राफिकल इंडिकेशन -जीआय) मानांकन मिळाल्यानंतर ‘कोल्हापुरी गुळा’ने जगभर लौकिक वाढवण्याच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत.

कोल्हापूरच्या अनेक वैशिष्टय़ांमध्ये प्रामुख्याने नाव येते गुळाचे. कोल्हापुरात एकेकाळी हजारावर गुऱ्हाळघरे होती. आता ती ३०० वर आली आहेत. त्यांची वर्षांकाठी उलाढाल सुमारे २५० ते ३०० कोटींची आहे. इथे तयार होणारा पिवळाधमक गूळ पाहताच त्याची चव चाखण्याचा मोह कोणालाही होतो. मात्र हा रंगच कोल्हापूर गुळाच्या जीवावर उठला असून त्यामुळे भेसळ वाढू लागली आहे.

गुळाला पिवळा रंग येण्यासाठी सल्फरची पावडर मिसळण्याची पद्धत आहे. पण सरकारने यासाठी अन्न सुरक्षा कायद्यानुसार ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा ५ ते १० पट अधिक सल्फर मिसळले जात आहे. या पिवळेपणासाठी सोडियम काबरेनेट, मेटानिल यलो, झेएफएस, सोडीयम हायड्रोफॉस्फेट, कॅल्शियम काबरेनेट अशी अन्य रसायनेदेखील बिनदिक्कतपणे गुळात मिसळली जातात. या साऱ्यांमुळे हा गूळ दिवसेंदिवस भेसळीचे मोठे आगार बनत आहे. त्यामुळे पिवळ्या रंगाला भुलून गूळ खरेदी करण्यापूर्वी सावधानतेचा सल्ला जाणकार देतात.

भेसळीची कर्नाटकी पद्धत

कोल्हापुरी गुळाला बदनाम करण्यात शेजारच्या कर्नाटक राज्याचाही मोठा हातभार आहे. तेथे गुळात साखर मिसळून कृत्रिम गोडवा वाढवण्याचे प्रकार घडतात. ते पाहून कोल्हापूर परिसरातही हे प्रकार सर्रास होऊ लागले आहेत. पण अशा गुळाला पाणी सुटत राहिल्याने पुढे चिकचिकपणा वाढून हा गूळ खाण्यायोग्य रहात नाही. रंगांसाठीची रसायनांची आणि गोडीसाठी साखरेची ही भेसळ आता जगजाहीर होऊ लागल्याने त्याचा परिणाम कोल्हापुरी गुळाच्या मागणीवर होऊ लागला आहे.गुळातील भेसळीच्या तक्रारी वाढल्या, की अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी तात्पुरती कारवाई करतात. त्यावर गुऱ्हाळघर चालक लगेच लोकप्रतिनिधींकडे धाव घेतात. त्यांच्याकडून लगेचच या कारवाईबाबत कानाडोळा करण्यास सुचवले जाते. परिणामी कारवाईची मोहीम थंड होते, अशी खंत एका शासकीय अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

सेंद्रिय गुळाचा पर्याय

अस्सल कोल्हापुरी गुळाची लज्जत चाखण्यासाठी सेंद्रिय गुळाचा पर्याय आहे. त्याला पिवळाधमक रंग नसला तरी चवीला तो सरस आणि आरोग्यदायी आहे. नेहमीच्या गुळापेक्षा त्याचा दर  काहीसा अधिक असतो. याची उपलब्धता सुमारे पाच टक्के असून उलाढाल पाच कोटीपर्यंत असल्याचे कोल्हापूर बाजार समितीचे सचिव दिलीप राऊत यांनी सांगितले.