News Flash

महाविकास आघाडीचा प्रयोग ग्रामीण भागात यशस्वी

कोल्हापूर जिल्ह्य़ातील हातकणंगले, चंदगड पालिकांमध्ये विजय

हातकणंगले येथे विजय मिळवल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

कोल्हापूर जिल्ह्य़ातील हातकणंगले, चंदगड पालिकांमध्ये विजय

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता येण्याची प्रक्रिया सुरू असतानाच स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांचे मनोमीलन होण्याची प्रक्रियाही सुरू झाली होती. कोल्हापूर जिल्ह्य़ातील हातकणंगले आणि चंदगड या नगर परिषदांच्या पहिल्याच निवडणुकीत महाविकास आघाडीने नगराध्यक्षपदासह सर्वाधिक नगरसेवक निवडून आणून यश मिळवले. तर गडहिंग्लजमध्ये पोटनिवडणुकीत दोन्ही जागा जिकल्या. महाविकास आघाडीचे हे यश कोल्हापूर जिल्ह्य़ात पुन:पुन्हा दिसू लागले आहे. हीच बाब भाजपसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना महाविकास आघाडीला रोखण्याचे आव्हान आणखी कठीण होत चालले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्तारूढ भाजप आणि महाविकास आघाडी आमने-सामने येईल तेव्हा हा सामना रंगतदार ठरेल.

कोल्हापूर जिल्ह्य़ात महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात सुरू होण्याआधीपासूनच झाला आहे. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी यांना सत्ता मिळण्यास शिवसेनेने दिलेला पाठिंबा कारणीभूत ठरला असल्याचे गेले अडीच वर्षे दिसून आले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचे साटेलोटे प्रभावी ठरल्याने सहकार्य विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला यश मिळत असताना भाजपची पाटी मात्र कोरी राहिली होती. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा प्रयोग सुरू झाला.

भाजपला चूक भोवली

चंदगड नगर परिषदेत भाजपची राजकीय ताकद लक्षणीय होती. माजी मंत्री भरमू पाटील, माजी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय शिवाजी पाटील यांनी येथे लक्ष घातले होते. भाजपने ‘चंदगड नगरपंचायत आमच्यामुळे झाली’ असा जोरकस प्रचार केला गेला. मात्र प्रचाराची हीच दिशा भाजपला अंगलट आली. कारण भाजपने आजरा व शिरोळ या सोयीच्या तालुक्यांमध्ये नगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेऊन निवडणुकाही घेतल्या. मात्र चंदगडकरांनी चार वेळा उपोषण केले तरी त्याकडे दुर्लक्ष केले. चंदगड ग्रामपंचायतीची निवडणूक तीन वेळा बहिष्कारामुळे घेता आली नाही. भाजपचा हा राजकीय दुटप्पीपणा चंदगडकरांना आवडला नाही. परिणामी त्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले.

निमशहरी जनतेचा कौल महाविकास आघाडीला 

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या नव्या राजकीय गोळाबेरीजमध्ये मित्रपक्षात सत्ता आणि पदाचे समान वाटप होईल असे दिसत आहे. गडहिंग्लज   नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस व जनता दल यांनी जिंकल्या. वास्तविक चंदगड, हातकणंगले आणि गडहिंग्लज यांचे स्थान पाहता या काही फार मोठय़ा नगरपालिका नाहीत. शहर व ग्रामीण असे संमिश्र स्वरूप असलेल्या या छोटय़ा शहरांचा चेहरा ग्रामीण ढंगाचा आहे. कोल्हापूरसारख्या महापालिकेच्या शहरात आणि आठ हजार लोकसंख्येच्या चंदगडसारख्या नगर परिषदेत म्हणजे ग्रामीण भागात महाविकास आघाडीला जनतेने कौल दिला आहे.

भाजपपुढे आव्हान वाढले

या तिन्ही ठिकाणी भाजपला अपेक्षित यश मिळवता आले नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर, माजी मंत्री भरमू पाटील यांनी नगरपंचायत जिंकण्याच्या दृष्टीने यंत्रणा सतर्क केली होती. तथापि त्यांचे हे प्रयत्न महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या संघटित शक्तीपुढे फिके पडले. मंडलिक मुश्रीफ व पाटील यांची राजकीय व्यूहरचना प्रभावी ठरली. हे भाजपसाठी आव्हानास्पद बनले आहे. भाजपच्या सत्ताकाळात कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यातील सर्वात मोठय़ा इचलकरंजीसह जयसिंगपूर, वडगाव या नगरपालिकांमध्ये भाजपने धवल यश मिळवले होते. आजरा नगर परिषदेची पहिली निवडणूक जिंकल्याने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रभावी राजकीय ताकदीचा प्रत्यय येत होता. सत्ता गेल्यानंतर मात्र यशाचा आलेख कायम राखणे भाजपला कठीण जात असल्याचे तिन्ही नगरपालिकांतील निकाल दाखवून देत आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 4:05 am

Web Title: maha vikas aghadi experiment successful in rural areas zws 70
Next Stories
1 कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्तानाटय़ात चुरस
2 मंत्रिपद डावलल्याने पी. एन. पाटील यांच्या कार्यकर्त्यांत संताप
3 नववर्षांचे स्वागत करताना कोल्हापूरकर मटणापासून दूर
Just Now!
X