ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित समीर गायकवाड याला सोमवारी (४ एप्रिल) होणाऱ्या सुनावणीस हजर करण्यात यावे. पुढील सुनावणीस तपास अधिकाऱ्यांनी हजर राहून तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी दिले. आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयात तपास यंत्रणा हजर न राहिल्याने न्यायालयाने व पानसरे कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली.
मंगळवारी सुनावणी दरम्यान तपास अधिकारी हजर नसल्याने  संशयित समीर गायकवाड याच्या विरुद्ध चार्जफ्रेम (आरोप निश्चिती) होऊ शकले नाहीत. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार (दि.४) रोजी होणार असून या सुनावणी दरम्यान समीरवर चार्जफ्रेम (आरोप निश्चिती) करण्याची शक्यता आहे.
मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान समीरचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी तपास अधिकारी कोर्टात हजर राहत नाहीत, न्यायालयाने तपासाचा अहवाल सादर करण्याचे दिलेले आदेशही जुमानत नाहीत, यामुळे संशयित आरोपीची चेष्टा सुरू असल्याचा युक्तिवाद केला. समीर गायकवाडवर चार्जफ्रेम करून खटला तत्काळ चालविण्यात यावा, अशी मागणीही पटवर्धन यांनी केली. तसेच समीरला ९ ऑक्टोबर नंतर न्यायालयात हजर करण्यात आले नसल्याने त्याच्याशी संवाद होऊ शकत नसल्याचे सांगत पुढील सुनावणी वेळी समीरला हजर करण्याची मागणी केली.
सरकारी वकील अॅड. चंद्रकांत बुधले यांची पानसरे हत्येप्रकरणी सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होती मात्र न्यायालय बदलल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही. यामुळे उच्च न्यायालयात तपासाचा अहवाल सादर करण्यात आला नाही. पुढील सुनावणी वेळी तपास अहवाल सादर करण्यात येईल. यासाठी १५ दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी बुधले यांनी केली.