राज्याच्या पुढच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे लढून आपले बळ आजमावले पाहिजे. राज्यात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे याची एकदा चाचणी झालीच पाहिजे, अशी भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना मांडली.

भाजपा आणि शिवसेनेने युती केल्यामुळे भाजपाला १०५ जागा मिळाल्या अन्यथा त्यांना इतक्या जागा मिळाल्या नसत्या, असे मत नुकतेच एका मुलाखतीत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. पवारांच्या या विधानाला उत्तर देताना पाटील म्हणाले, “शरद पवार यांनी मुलाखत देत असताना आपण जे विधान करीत आहोत ते कायमस्वरूपी नोंदवले जाणार आहे, याचे भान ठेवणे गरजेचे होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १०५, शिवसेनेला ५६ अशा युतीला १६१ जागा मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादी व काँग्रेस यांना एकत्र लढून ९८ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सर्वाधिक बळ हे भाजपाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होते.

सन २०१४ सालच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढली होती. तेव्हा दोन्ही पक्षांची वाताहत झाली होती. याचा अनुभव असल्यामुळेच दोन्ही काँग्रेसने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला होता, असे करूनही त्यांना आमच्या इतक्या जागा मिळवता आल्या नाहीत. मागील निवडणुकीत स्वतंत्र लढले असते तर तुमच्या २० आणि काँग्रेसच्या दहा जागा आल्या असत्या, असा टोलाही त्यांनी लगावला. खरेतर कोणाचे किती बळ आहे हे समजून घेण्यासाठी राज्यात एकदा चारही प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे लढून आपले बळ आजमावले पाहिजे. याचा फैसला एकदा होऊनच जाऊदे, असेही ते म्हणाले.

सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही – पाटील

विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीकडे गेली होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाकडे आला होता. या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस बोलतील. ती खूपच गोपनीय बाब आहे. तेथे मी बोलणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. राज्यातील सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही असेही ते यावेळी म्हणाले.