कोल्हापूर : राज्यातील महायुती शासनामधील मंत्री, आमदार यांनी केलेल्या चुकीच्या कृत्यांचे जिवंत प्रतिकृती आणि प्रदर्शन मांडणारे अनोखे आंदोलन येथे गुरुवारी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते. हाताला काळ्या फिती बांधून शिवसैनिकांनी निषेध नोंदवला.
ऐतिहासिक दसरा चौकात हे प्रदर्शन मांडले आहे. यामध्ये पैशांची बॅग घेऊन बसलेले मंत्री संजय शिरसाट, कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड, विधानसभेत मोबाइलवर रमी खेळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, अघोरी पूजा करणारे मंत्री भरत गोगावले,
कोल्हापुरातील १०० कोटी रुपये खर्चाच्या रस्ते कामावरून टीका होणारे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या जिवंत प्रतिकृती आणि प्रदर्शन आंदोलनात दाखवण्यात आले. सत्ताधारी मंत्री आणि आमदार यांचा भ्रष्ट कारभार जनतेसमोर दाखवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगितले.
रस्ते कामावरून विरोधक नाहक आरोप करतात असे शिंदे गटाचे समन्वयक सत्यजित कदम यांनी वक्तव्य केले होते. यावर इंगवले यांनी कोल्हापुरातील शंभर कोटीचे रस्ते पाण्यात खडीसारखे वाहून गेले असल्याकडे लक्ष वेधले. शहर प्रमुख सुनील मोदी, विशाल देवकुळे, प्रतिज्ञा उत्तुरे, रिमा देशपांडे, दीपाली शिंदे, अनिता ठोंबरे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.