कोल्हापूर : आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिरातील गैरकारभार आणि ट्रस्टींच्या वागणुकीमुळे देवालयाचे नुकसान होत आहे. चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना बाजूला काढले जात आहे. याच्या निषेधार्थ, तसेच ट्रस्टींच्या हकलपट्टीसाठी येत्या रविवारी (९ नोव्हेंबर) मुधाळ तिट्टा ते बाळूमामा देवालयापर्यंत घंटानाद मोर्चा काढण्यात येणार आहे. ही माहिती हालसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी ग्रुपचे अध्यक्ष निखिल मोहिते-कुऱ्हाडे, महांतेश नाईक, संजय शेंडे, सागर पाटील, संतोष दाईगडे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

त्यांनी सांगितले, की बाळूमामा मंदिर अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले आहे. येथे भाविकांची सतत रीघ असते. मात्र, मंदिराचे कामकाज पाहणाऱ्या ट्रस्टच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह लागले आहे. लेखापरीक्षणात यावर गंभीर ताशेरे मारण्यात आले आहेत. स्थानिक आमदारांचा हस्तक्षेप वाढलेला आहे. ऊस बिल, बकरी, भंडारा, धान्य यामध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला.

ट्रस्टमध्ये सुरुवातीपासून भ्रष्टाचार असून, अनागोंदी कारभार सुरू आहे. सत्ता गाजवण्यासाठी गावातीलच नातेवाईक ट्रस्टींची नेमणूक होते. अखंड महाराष्ट्राचे बाळूमामा हे दैवत असताना फक्त एका गावाचे मंदिर असल्यासारखा मनमानी कारभार चालत आहे. ट्रस्टी स्वतः नियम करतात आणि ते स्वतः त्याची ते पायमल्ली करतात. जमिनींसह ऊसही ट्रस्टींच्या नावे आहे. धर्मादाय आयुक्तांचा पक्षपाती कारभार यास कारणीभूत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.