टाळेबंदीतही पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची केळी उत्तम दराने आखाती देशात निर्यात होऊ लागली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ातील आतापर्यंत २०० टन केळी निर्यात आली असून येत्या दोन-तीन दिवसांत सातारा जिल्ह्य़ातील सुमारे ५०० टन केळी निर्यात होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

टाळेबंदीचा फायदा शेतमालाचे दलाल उठवत आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीमोल दराने खरेदी करून तो ग्राहकांना अव्वाच्या सव्वा किमतीला विकला जात आहे. यामध्ये शेतकरी व ग्राहक दोघेही भरडले जात आहेत. अपेक्षित दर नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतमाल शेतातच कुजवून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीतही असेच  चित्र पाहायला मिळत आहे. टाळेबंदी पूर्वी आठ ते दहा हजार रुपये प्रती टन दराने केळी खरेदी केली जात होती. आता दोन ते तीन हजार रुपये प्रती टन दराने अशा दराने दलाल खरेदी करीत आहेत. ही बाब लक्षात घेऊन या कोल्हापूरमधील ‘रॉक ग्लोबल’ या शेतमाल निर्यात कंपनीचे चालक बाळकृष्ण जाधव यांनी केळी निर्यात करण्याचा निर्णय घेतला.

केळी निर्यातीला चालना

कोल्हापुरातील कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांची जाधव यांनी भेट घेऊन निर्यातीमधील अडचणी सांगितल्या. त्याबाबत ‘अपेडा’चे प्रशांत वाघमारे, पणन संचालक सुनील पवार, सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांचे मार्गदर्शन घेतले. त्यातून केळी निर्यातीच्या अडचणी दूर होऊन प्रत्यक्ष केळी दुबई, मस्कत, इराण व इराक या देशांना निर्यात झाली आहेत. ‘कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्य़ातील दहा शेतकऱ्यांकडून केळी खरेदी करण्यात आली. त्यांना सध्याच्या बाजारभावापेक्षा दुप्पट म्हणजे प्रति टन सहा ते सात हजार प्रति टन असा चांगला दर निर्यातदार कंपनीने दिला आहे. आता सातारा जिल्’ातील कराड परिसरातील चारशे ते पाचशे टन केळी येत्या दोन-तीन दिवसात निर्यात होतील. निर्यात झालेली केळी ही उत्तम आकाराची, डाग विरहित आणि ‘जी नाईन या कॅव्हेंडिश’ वाणाची आहेत, असे सुभाष घुमे यांनी सांगितले.