महापालिका निवडणुकीतील प्रभागांच्या आरक्षणातील गोंधळ चर्चेत असताना आता महापालिकेच्या २९ प्रभागांच्या रचनेत फेरबदल झाल्याने त्यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. महापालिका प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर हरकती, सूचना मागवण्यात आल्यानंतर त्याची सुनावणी घेऊन ८१ प्रभागांपकी २९ प्रभागांत फेरबदल करण्यात आले असून त्याची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तीन प्रभागांची नावेही बदलण्यात आली आहेत.
कोल्हापूर महानगरपालिकेची पंचवार्षकि निवडणूक ऑक्टोबरअखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ाध्ये होणार आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पहिला टप्पा असलेली प्रभाग रचना ३१ जुल रोजी जाहीर करण्यात आली. पूर्वीच्या ७७ प्रभागांमध्ये नव्या ४ प्रभागांची भर पडून  प्रभाग तयार झाले त्यानंतर ऑगस्ट रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. प्रभाग रचना व आरक्षण सोडतीवर हरकती व सुनावणी घेण्यात आली. प्रभाग रचनेबाबतच्या हरकतींवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापुरात सुनावणी घेतली. या वेळी साधारण दीडशे जणांनी सुनावणीसाठी उपस्थिती लावली होती. हरकतींमध्ये एकाच गल्लीचे दोन भाग, एकाच चौकाचे दोन भाग तसेच एकच मुख्य रस्ता दोन प्रभागांमध्ये गेल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानुसार भौगोलिक संलग्नतेचा काही ठिकाणी विचार करून प्रभाग रचनेमध्ये २९ ठिकाणी बदल करण्यात आले आहेत. या बदलाचा काही उमेदवारांना लाभ होणार आहे तर काहींना फटकाही बसण्याची शक्यता आहे. आता करण्यात आलेला बदल हा कायम राहणार आहे. प्रभागामध्ये असलेल्या एका प्रगणक गटामध्ये साधारणत ४५० ते ५०० लोकसंख्येचा समावेश असतो. अशाप्रकारे काही प्रभागात एक प्रगणक गट, काही ठिकाणी दोन तर काही ठिकाणी चार प्रगणक गट बदलले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून दोनशे मतदारांपासून एक हजार मतदारांपर्यंत बदल काही प्रभागात झालेला आहे. त्याचा काही उमेदवारांना लाभ मिळण्याची शक्यता आहे तर काहींना राजकीय तोटा सहन करावा लागू शकतो. सुनावणीच्या वेळी आलेल्या हरकती व सूचनेनुसार तीन प्रभागांची नावे बदलण्यात आली आहेत. यामध्ये कसबा बावडा पॅव्हेलियनऐवजी कसबा बावडा-लाइन बाजार, कोकणे मठऐवजी शिपुगडे तालीम व प्रभाग क्रमांक स्वातंत्र्य सनिक वसाहतऐवजी स्वातंत्र्यसनिक कॉलनी, असे बदल करण्यात आले आहेत.