कोल्हापूर : जयसिंगपूर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आगमन व मिरवणुकीस स्थगिती देण्याच्या मागणीची याचिका ‘सर्किट बेंच’ न्यायालयाने फेटाळून लावली. यामुळे पुतळा आगमन सोहळा आता दिमाखात होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
जयसिंगपूर येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचा वाद चर्चेत आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुतळा उभरण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र तो ज्या ठिकाणी बसवला जाणार आहे. त्या जागेबाबत आक्षेप घेऊन त्यास स्थगिती मिळावी या मागणीची याचिका विश्वजीत कांबळे, सुरेश भाटिया व इतर यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोर दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती कर्णिक आणि न्यायमूर्ती देशमुख यांच्या समोर सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्यांनी आगमन सोहळा व मिरवणुकीस स्थगिती मिळावी, अशा प्रकारचा आग्रह न्यायालयासमोर लावून धरला. पण उच्च न्यायालयाने त्यास स्थगिती देण्यास नकार दिला.
यावर याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. असीम सरोदे यांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असा मुद्दा उपस्थित केला. परंतु त्यावर न्यायालयाने आपले मत मांडताना ती जबाबदारी शासन अथवा प्रशासनाची असल्याचे सांगितले. सरकारी वकील यांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती शासन हाताळेल असे न्यायालयासमोर स्पष्ट केले. यावर न्यायालयाने पुतळा आगमन सोहळा असून तो गैर अथवा चुकीचा नाही असे सांगताना मिरवणुकीला स्थगिती मागणे योग्य नाही, असे म्हणत याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली.
जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीने ॲड. एम. एल. पाटील यांनी नगरपालिका सर्व संबंधितांच्या रीतसर परवानगी घेऊन पुतळा उभारण्याचे निश्चित करेल, असे न्यायालयाला सांगितले. नगर परिषदेतर्फे ॲड. नागेश चव्हाण, ॲड. गजानन आंबेकर यांनी तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वतीने ॲड. सतीश बोरुलकर, ॲड. मनोज पाटील यांनी बाजू मांडली.
दरम्यान, शिरोळ तालुक्यातील ऐतिहासिक भीमज्योत परिक्रमा उत्साहात पार पडली. गावागावांत फुलांची उधळण, साखर–पेढ्यांचे वाटप, महिलांचा मोठा सहभाग, हलगीचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी आणि जय भीमच्या जयघोषात परिक्रमेचे स्वागत करण्यात आले.
भीमज्योत परिक्रमेचे स्वागत
शिरोळ तालुक्यातील ऐतिहासिक भीमज्योत परिक्रमा उत्साहात पार पडली. गेल्या ५० वर्षांपासूनचे स्वप्न असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अखेर साकार होत असल्याने शिरोळ तालुक्यात मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
दरम्यान, टाकळीवाडी, अकिवाट, बस्तवाड, मजरेवाडी, कुरुंदवाड व औरवाड येथेही स्वागताचा जल्लोष झाला. विशेष म्हणजे औरवाड येथे मुस्लिम बांधवांनी बहुजन समाजासोबत ज्योतीचे परिक्रमण करून सामाजिक ऐक्याचा आदर्श घालून दिला. या वेळी जय भीमच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. या परिक्रमेत विविध गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. गावागावातील उत्साह पाहून भीमज्योत परिक्रमा सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर उत्सव ठरली आहे.