कोल्हापूर : गोकुळ दूध संघ पुणे येथे गुंतवणूक कमी करत असताना तेथे दूध विक्री वाढत आहे. तर मुंबईमध्ये ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून दूध विक्रीसाठी प्रयत्न सुरू असताना तेथे विक्रीत घट होत असल्याचे विपणन विभागाच्या अहवालाधारे स्पष्ट झाले आहे. गोकुळच्या भवितव्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे, असे मत गोकुळच्या संचालिका, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

 मुडिशगी येथील दोन दूध संघांचा पुरवठा गोकुळने बंद केला आहे. हा विषय आज संचालक मंडळाच्या बैठकीत महाडिक यांनी उपस्थित केला असता व्यवस्थापनाने स्थानिक संचालकांनी शिफारस नसल्याने दूध संकलन थांबवले असल्याचे सांगितले. दूध स्वीकारण्याबाबत गोकुळमधील पायंडा आणि कायदा याची गल्लत करू नये. हातकणंगले तालुक्यात मी संचालक असताना किती संस्थांची शिफारस माझ्याकडून घेतली गेली?  कागल तालुक्यामध्ये दोन संचालक असताना केवळ एकाच संचालकांची शिफारस का स्वीकारली जाते? ही दुटप्पी व मनमानी कामकाज पद्धत आहे. मुडिशगी येथील महिला संघाचे दूध संकलन बंद केले असल्याने त्यांनी हे दूध अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे द्यावे का? अशी विचारणा त्यांनी केली.

न्यायालयात आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य प्रकल्पासाठी राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथील एका कंपनीची २५ वाहने केवळ विपणन विभागाच्या शिफारशीच्या आधारे भाडेतत्त्वावर वापरली आहेत. विद्यमान ठेकेदार वाहन पुरवण्यासाठी तयार असताना त्यास नाकारले गेले आहे. संचालक मंडळाच्या विषयपत्रिकेवर विषय येण्यापूर्वीच असे विषय मनमानी पद्धतीने आणि काहीतरी साध्य करण्यासाठी केले जात आहेत. याबाबत सहकार विभागाकडे तक्रार केली जाणार आहे. मी तसेच वाहतूक ठेकेदार न्यायालयात गोकुळच्या चुकीच्या कारभाराविरुद्ध आव्हान देणार आहे, असेही महाडिक यांनी सांगितले.