कोल्हापूर : विरोधी राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी ईडी सारख्या यंत्रणांचा केंद्र शासन वापर करत आहे. यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. राज्य बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, प्रदेश सचिव शशांक बावचकर उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, मनमोहन सिंग, वाजपेयी यांसारख्या नेत्यांच्या सत्ताकाळात ईडी वापर आवश्यक त्या कारवाईसाठी केला जात होता. आताचे केंद्रातील शासन ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा दुरुपयोग करत आहेत. विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी या यंत्रणेचा वापर केला जात आहे. अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी कोल्हापूरची पोटनिवडणूक हे एक माध्यम असून भाजपला पराभूत करून मोदींच्या धोरणाचा पराभव करत असल्याचा संदेश द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्रातील सरकार आर्थिक पातळीवर अपयशी ठरले आहे. जीडीपी वाढला असल्याची चुकीची आकडेवारी मांडली जात आहे. युक्रेन युद्धाचा मुद्दा पुढे करून पेट्रोलमध्ये भरमसाठ दरवाढ केली आहे. यातून देशात महागाईचा भडका उडाला असून जनता हैराण झाली आहे. मोदी सरकारचे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटले आहे. काँग्रेस महागाई विरोधात मोठे आंदोलन उभे करेल असा, इशारा त्यांनी दिला.
काँग्रेस पक्षात संघटनात्मक काही बदल व्हावे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. याबाबतचे गोपनीय पत्र बाहेर पडले. त्याला माध्यमांनी जी २३ असा रंग दिला. मात्र पक्ष नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न असे चित्र रंगवले गेले आहे. सध्या जे प्रयत्न सुरू आहेत; त्यातून काँग्रेस बळकट करण्याचा सर्वाचा प्रयत्न राहील, असेही चव्हाण म्हणाले.