जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयांना टाळे

शेतकरी संपाची धग पश्चिम महाराष्ट्रात मंगळवारीही कायम राहिली. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूर येथील जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयास टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. या वेळी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्य़ात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास टाळे ठोकले. किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी करवीर तहसील कार्यालयास टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिरोळ तहसील कार्यालयास टाळे  ठोकले. या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, शेतकरी संपाच्या आजच्या सहाव्या दिवशी येथील बाजार समितीतील व्यवहार बऱ्यापकी सुरळीत राहिले.  कांदा, बटाटा, कोकणातून येणारा आंबा, फळे, भाजीपाला यांची आवक नित्याप्रमाणे राहिल्याने वाहनांची वर्दळ दिसत होती.

सांगलीमध्ये शेतकरी मंगळवारी शेतकरी आंदोलनात नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न शेतकरी आंदोलकांनी केला. या वेळी पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडत असताना २० हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. बंदी आदेश मोडून आंदोलन केलेल्या १४ कार्यकर्त्यांविरूध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्य़ात शेतक ऱ्यांच्या संपाच्या सहाव्या दिवशीही आंदोलनाची धग कायम असतानाच आंदोलक शेतक ऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांत व तहसील कार्यालयांना टाळे ठोकण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य कार्यालयांभोवती पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असतानाही मंगळवेढा येथे प्रांत कार्यालयाला टाळे ठोकले गेलेच. शिवाय पंढरपूरच्या तहसील कार्यालयालाही टाळे ठोकण्यात आंदोलक शेतकरी यशस्वी झाले.

दरम्यान, मंगळवारी दुपारी पुणे-विजापूर बाह्य़वळण महामार्गावर मोहोळ तालुक्यातील कुरूल-कामती येथे जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांंनी तब्बल दोन तास ‘रास्ता रोको’ आंदोलन करून वाहतूक रोखून धरली होती. या आंदोलनात एक हजारापेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले होते.

सातारा जिल्ह्य़ातून कोकणात मोठय़ा प्रमाणात भाजीपाला पाठवला जातो. परंतु या संपामुळे तो रोखण्यात आल्याने कोकणात भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली आहे. साताऱ्यातून महाड, खेड, चिपळूणच्या बाजारपेठेत साताऱ्यातून भाजीपाला जात असतो. यावर या संपाचा परिणाम झाला आहे.

दुध बंदोबस्तात मुंबईकडे

संपामुळे गेले काही दिवस कोल्हापूर जिल्ह्य़ातील दूधसंकलन विस्कळीत झाले आहे. एकूण दूध संकलनात मोठी घट झाली असून पुण्या – मुंबईकडे होणाऱ्या वितरणावरही परिणाम झाला आहे. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी गोकुळ, वारणाकडील दूध संकलनात थोडीशी सुधारणा झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज सात लाख लीटर दुधाचे संकलन झाले असून, हे दूध घेऊन जाणारे टँकर बंदोबस्तात मुंबईला रवाना झाले.