कोल्हापूर : कोल्हापूर गोकुळ दूध संघामध्ये महायुतीशी निगडित घटकांनी एकत्रित काम करण्याची गरज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली असली तरी विरोधी गटाच्या नेत्या, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्याचे भूमिका कायम ठेवली आहे.
सत्ताधाऱ्यांसमवेत महाडिक या वार्षिक सभेला मंचावर बसतील अशी अपेक्षा अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी व्यक्त केली होती. पण गोकुळ कडून प्रश्नांची अपेक्षित उत्तरे मिळाली नसल्याने उद्या मंगळवारी सभेवेळी सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा पंचनामा करण्याचा इरादा महाडिक यांनी व्यक्त केला आहे. यामुळे गोकुळ मध्ये उद्या महायुती विरुद्ध महायुती असा वेगळाच सामना पाहायला मिळणार आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा गेली दहा वर्षे सातत्याने गाजत आहे. वार्षिक सभेच्या निमित्ताने संस्थेच्या वर्षभरातील आर्थिक कामकाजासह एकूणच कामगिरीचा लेखाजोखा करण्याची, सत्ताधाऱ्यांच्या चुकांवर जाब विचारण्याची प्रभावी संधी मिळत असते. पूर्वी गोकुळमध्ये महादेवराव महाडिक यांची सत्ता असताना तत्कालीन विरोधी गटाचे नेते सतेज पाटील हे वार्षिक सभेला उपस्थित राहून सत्ताधाऱ्यांच्या कामकाज पद्धतीवर प्रहार करीत असत. गोकुळमधील भ्रष्ट कारभाराचा पंचनामा त्यांच्याकडून सभेत केला जात असे. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षांना हा टोकदार हल्ला परतावून लावणे जड जात असे. विरोधी गटाचा हा किल्ला लढवण्याचा फायदा पुढे सतेज पाटील यांना गोकुळच्या निवडणुकीत होऊन ते सत्तेत आले.
गेली चार वर्ष गोकुळमध्ये सतेज पाटील – हसन मुश्रीफ या मित्रांची सत्ता राहिली. परंतु गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष झाला पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर सतेज पाटील यांच्या अपेक्षांना धक्का बसला. आणि गोकुळच्या अध्यक्षपदी मंत्री पुत्र नावेद हसन मुश्रीफ यांची निवड झाली. त्यांची उद्या होणारी पहिलीच वार्षिक सर्वसाधारण सभा. त्यांना या सभेत विरोधी संचालकांकडून होणाऱ्या टीकेला तोंड द्यावे लागेल असे दिसत नाही.
गेले पंधरा दिवस वार्षिक सभेच्या निमित्ताने गोकुळ दूध संघाच्या वतीने तालुकानिहाय संपर्क सभा सुरू आहेत. या सभांमध्ये गोकुळमधील वासाचे दूध, विरोधी गटाला सापत्न वागणूक आदी मुद्द्यावरून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळच्या संचालक मंडळाला घेरले आहे.
गोकुळ पुढील आव्हाने वाढली
गोकुळच्या कारभाराविरोधात उद्धव ठाकरे शिवसेना, गर्जना संघटना यांच्याकडून सातत्याने आव्हान दिले जात आहे. शिवसेना ठाकरे गटाने केलेल्या तक्रारीनंतर गोकुळमधील भ्रष्ट कारभाराची चौकशी दुग्ध निबंधकांनी सुरू केलेली आहे. गर्जना संघटनेने कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये भ्रष्टाचाराविरोधात याचिका दाखल केली आहे. गोकुळच्या विरोधात असे वातावरण तापले असताना विरोधी गटाच्या संचालिका महाडिक यांची सोमवारी सायंकाळपर्यंत भूमिका अनिश्चित असल्याने उद्याच्या गोकुळच्या सभेत महायुतीचे सारे घटक एकत्रित असणार आणि विरोधाचा आवाज क्षीण होणार असे चित्र निर्माण झाले होते. त्यातून सत्ताधाऱ्यांची हातमिळवणी करीत शौमिका महाडिक यांनी विरोधाचे शस्त्र म्यान केल्याची चर्चा होत होती.
मुश्रीफ यांचे आवाहन व्यर्थ
गोकुळचे नेते हसन मुश्रीफ यांनी खासदार धनंजय महाडिक यांना उद्देशून गोकुळमधील महायुतीच्या सत्तेत मिठाचा खडा टाकू नका असे बजावले होते. त्याचाच परिणाम म्हणून की काय मंगळवारी गोकुळची वार्षिक सभा होणार असताना या धनंजय महाडिक यांनी आवाज उठवला ना विरोधी गटाचा एकाकी किल्ला लढवणाऱ्या संचालिका शौमिका महाडिक यांनी. सत्तारूढ – विरोधी असे सारेच संचालक आणि नेते सत्तेचे नवनीत चाखायला प्रथमच एकाच पंक्तीत असणार असे चित्र दिसत होते.
तथापि सायंकाळी पत्रकार परिषद घेत शौमिका महाडिक यांनी सत्ताधारी गटाकडून माझ्या प्रश्नाची मुद्देसुद उत्तरे दिलेली नाहीत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी उद्याच्या सभेत विरोधात राहून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उद्याच्या सभेत प्रथमच महायुतीचा अध्यक्ष सभेचे अध्यक्षस्थान भूषवत असताना त्याला महायुतीच्याच महायुतीचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांच्याकडून कडवे आव्हान मिळणार असल्याने हा सामना कसा रंगणार हे लक्षवेधी ठरले आहे.