कोल्हापूर : अदृश्य शक्तीच्या पुढाकाराने एकत्रित आलो आहोत. कागल व मुरगुड नगरपालिकेमध्ये विकासाच्या हेतूसाठी एकसंघपणे वाटचाल करणार आहोत, असा निर्वाळा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समरजित घाटगे यांनी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत दिला. मात्र ज्या दृश्य शक्तींचा उल्लेख केला ते वरिष्ठ नेते कोण याचा उल्लेख या दोघांनीही खुबीने टाळला.

कागल तालुक्यातील राजकारणाला अनपेक्षितपणे वेगळे वळण लागले आहे. या विधानसभा मतदारसंघातील हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे टोकाचे वैरभाव असलेले नेते पालिका निवडणुकीसाठी एकत्रित आले आहेत.या दोघांना एकत्र आणणारी राजकीय शक्ती नेमकी कोण याविषयी आज पत्रकार परिषदेत वारंवार विचारणा केली. मात्र त्यांनी या शक्तीचा नामोल्लेख करण्याचे जाणीवपूर्वक टाळले.

यावेळी घाटगे म्हणाले की, कागल, मुरगुड या दोन्ही नगरपालिकेचा विकास व्हावा या हेतूने आम्ही एकत्रित आलो आहोत. कार्यकर्त्यांना कल्पना न देता आम्ही एकत्र आल्याबद्दल माफी मागतो. यापुढे हसन मुश्रीफ व मी समन्वयाने काम करू.. कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले मतभेद सोडवले जाईल. सत्तेसाठी नव्हे तर कागलच्या विकासासाठी पावले टाकत आहोत.अदृश्य शक्तीच्या आशीर्वादाने मी व हसन मुश्रीफ एकत्र आलो आहोत, असेही ते म्हणाले.

यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले, समरजित घाटगे यांची शाहू विकास आघाडी ही महायुतीचा घटक बनलेली आहे. घाटगे हे लोकसभेत जाणार की विधानसभेत हे आताच सांगता येणार नाही. माझ्याबाबत संजय मंडलिक यांनी केलेली विधाने अयोग्य आहेत. त्यांनी इतके अस्वस्थ होण्याची गरज नाही.

कागल तालुक्यात यापूर्वीही शामराव भिवाजी पाटील आणि सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंहराजे घाटगे आणि सदाशिवराव मंडलिक तसेच आणि मी आणि समरजित घाटगे यांच्यात टोकाचा संघर्ष झालेला आहे. संघर्ष करून शक्ती वाया घालवण्यापेक्षा विकासासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याने आम्ही सोबत राहत आहोत, असे मुश्रीफ म्हणाले.

ईडी बाबत सावध पवित्रा

हसन मुश्रीफ यांची ईडी करावी चौकशी करण्यात आली होती. यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुढाकार घेतला होता. तर त्याला समरजित घाटगे यांनी स्थानिक पातळीवर पाठबळ दिले होते. त्यामुळे ईडीच्या चौकशीबाबत बोलताना मुश्रीफ व घाटगे यांनी सावध पवित्रा घेत ही प्रक्रिया न्यायाधीन आहे. त्यामुळे त्यावर बोलणे योग्य नाही, इतकेच बोलून विषयांतर केले.

माने पदवीधर साठी

दरम्यान समरजित घाटगे यांना पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिली जाणार आणि तेथून मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक प्रताप उर्फ भय्या माने यांची उमेदवारी कापली जाणार अशी चर्चा होती. पण आज मुश्रीफ यांनी प्रताप माने यांच्या उमेदवारी अखेरपर्यंत कायम राहणार असल्याचा निर्वाळा दिला.