कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. पावसाचा वेग वाढल्याने यंदा प्रथमच पंचगंगा नदी पात्राच्या बाहेर पडली आहे. तर, पंचगंगा नदीची पाणीपातळी ३० फूट झाली असून, जिल्ह्यात २९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
कोल्हापूर शहरामध्ये पावसाचा जोर आज वाढला. दिवसभर पावसाच्या मोठ्या सरी येत होत्या. सायंकाळी रेड अलर्ट देण्यात आला होता. रात्री अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यांवर जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदी ३०.४ फुटांवरून वाहत आहे. राजारामसह २९ बंधारे अद्यापही पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.
इचलकरंजीत आपत्कालीन यंत्रणा सज्ज
इचलकरंजीत पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने येथे रबरी बोटीसह आवश्यक यंत्रणा सज्ज केली आहे. घाटावर लोखंडी कठडे लावून लोकांना प्रवेश बंद केला आहे.