कोल्हापूर : राज्य शासनाने “वन नेशन वन पॉवर” धोरण तातडीने अंमलात आणणे गरजेचे आहे, अन्यथा वाढत्या वीज दरामुळे उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राचा कणा मोडण्याचा धोका निर्माण होईल, असा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी येथे दिला.
देवल क्लब येथे आयोजित राज्यस्तरीय वीज परिषदेत ते बोलत होते. ही परिषद महाराष्ट्र राज्य चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, परिषदेचे आयोजन महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, दि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री – साऊथ महाराष्ट्र झोन, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले, दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमन – कोल्हापूर चॅप्टर आणि श्री लक्ष्मी इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
ललित गांधी म्हणाले की, वीज हे उद्योग, व्यापार व शेतीचे जीवनमान आहे. मागील काही वर्षांपासून दरवाढ सातत्याने होत आहे. उत्पादन खर्च झपाट्याने वाढल्यामुळे उद्योगांची स्पर्धात्मकता कमी होत असून लघुउद्योगांना तोट्याला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांवरही याचा मोठा परिणाम होत असून ही परिस्थिती गंभीर आहे. राज्य शासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर स्थिती अधिक बिघडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
स्मार्ट वीज मीटरबाबत त्यांनी स्पष्ट केले की, ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण होणे महत्त्वाचे आहे. “या प्रणालीमुळे खर्चाचा बोजा वाढणार नाही, याची खात्री सरकारने द्यावी. ग्राहकांना अडचणीत आणणारे निर्णय नकोत,असेही ते म्हणाले. गांधी यांनी महाराष्ट्र चेंबरच्या शंभर वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. “चेंबरने नेहमीच विधायक भूमिका घेत उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रासाठी पावले उचलली आहेत. वीज, कर, निर्यात-आयात धोरण, पर्यावरण, कामगार कायदे आदी विषयांवर चेंबरने गेल्या दहा वर्षांत सतत प्रयत्न केले आहेत, असे ते म्हणाले.
भविष्यातील दिशा स्पष्ट करताना त्यांनी सांगितलेकी, या परिषदेला राज्यभरातून उद्योगपती, व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक प्रतिनिधींनी आपापल्या अडचणी मांडून सरकारने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी स्वागत केले. महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे सदस्य विक्रांत पाटील यांनी वीज परिषदेचा हेतू स्पष्ट केला. महाराष्ट्र चेंबर ट्रस्ट बोर्ड अध्यक्ष आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, श्रीकृष्ण परब, संजय सोनवणे, प्रदीप खाडे, राजेंद्र सूर्यवंशी, कमलाकांत कुलकर्णी, स्वरुप कदम, मोहन कुशिरे, राहुल पाटील, महेश दाते आणि सारंग जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र चेंबर ऊर्जा समितीचे अध्यक्ष मुकुंद माळी, उद्योजक सचिन शिरगावकर, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे सचिव जावेद मोमीन, महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, वीज ग्राहक तक्रार निवारण मंचचे माजी अध्यक्ष अजय भोसरेकर, सजग नागरिक मंच पुणेचे विवेक वेलणकर, प्रयास संस्था पुणेचे शंतनु दीक्षित आणि ॲड. शेखर करंदीकर यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, प्रमुख पाहुण्यांनी वाढत्या वीज दरवाढीबाबत तसेच स्मार्ट मीटरसंबंधी लोकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याची गरज अधोरेखित केली. उद्योगपती, व्यापारी आणि शेतकरी यांच्या हितासाठी शासनाने ठोस निर्णय घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.