कोल्हापूर : कागल तालुक्यातील व्हनाळी या गावात काल रात्री ऑर्केस्ट्रा सुरू असताना दोन गटांत जोरदार वाद झाला. यातून परस्परांमध्ये बेदम मारहाण झाली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कागल पोलीस स्टेशनच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. यानंतर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर दलित कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाल्याने हे प्रकरण तणावपूर्ण बनले आहे.

व्हनाळी गावांमध्ये यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम सुरू आहेत. काल रात्री कार्यक्रम सुरू होता. थोरपुरुषांची गाणी लावण्यावरून यात्रेमध्ये दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. त्यावर गावातील प्रमुखांनी हे प्रकरण मिटवले. पण नंतर पुन्हा गैबी चौकामध्ये एकदा वाद सुरू झाला. यात्रेनिमित्त आतषबाजी आयोजित करण्यात आली होती. काही ठिकाणचे रस्त्यावरील दिवे बंद करण्यात आले होते. याच दरम्यान आधीचे प्रकरण पुन्हा तापले. त्यातून दोन गटांमध्ये बेदम मारहाण सुरू झाली. एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत मारहाण झाली. कमालीचा तणाव पसरला. त्यानंतर गावातील दलित समाजाचे लोक तसेच तालुक्यातील दलित संघटनांचे कार्यकर्ते कागल पोलीस ठाण्यामध्ये जमले.

हेही वाचा : मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी; स्वाभिमानीचा पाठिंबा जाहीर

रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांनी संबंधितांवर अ‍ॅट्रोसिटी गुन्हा दाखल करा , अशी मागणी सुरू ठेवली. तर काहीजणांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच याच मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले. पहाटे दहा जणांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटी गुन्हा दाखल केला असून आणखी आठ जणांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, फोनवरून धमकावल्या प्रकरणी एका दलित कार्यकर्त्याविरोधातही दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणामुळे कागल पोलिस ठाण्याच्या परिसरात रात्रभर तणाव दिसून आला.

हेही वाचा : पुन्हा एकदा ठरलं! सुळकुड पाणी योजनेचा कंडका पडणार; मुख्यमंत्र्यांकडे शुक्रवारी बैठक

वादाचा इतिहास

व्हनाळी या गावामध्ये यापूर्वीही काही वादाच्या घटना घडल्या असल्याची माहिती मिळत आहे. सन २०१८ मध्ये गावात दोन गटांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला होता. त्यातून अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर मागील वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्हाॅट्सअ‍ॅप स्टेटस ठेवल्यावरून दोन गटांत वाद झाला होता. या प्रकरणीही एक गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती मिळत आहे.