कोल्हापूर : आजरा सहकारी साखर कारखाना फार मोठ्या आर्थिक अडचणीतून जात असून त्यातून त्याला सावरूनच दाखवू, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका काय? या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, आता आजऱ्याचे रणशिंग फुंकले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मी, आमदार सतेज पाटील व आमदार विनय कोरे यांनी भरपूर प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश आले नाही.
हेही वाचा : इथेनॉल निर्मिती बंदीचा तो निर्णय लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून – आमदार सतेज पाटील
आजरा कारखाना फार मोठ्या अडचणीत आहे. या कारखान्याची आर्थिक घडी विस्कटायची नसेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करावी यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. काही घटना अशा घडल्या की एकमेकांचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर या निवडणुकीत आमचे राष्ट्रवादीचे पॅनल आहे. आजरा कारखान्याचा परिसर इको सेंसिटिव्ह झोनमध्ये असल्यामुळे तिथे डिस्टीलरी व को- जन उभारण्याला बंदी आहे. ती बंदी काढावी लागेल. त्यासाठी प्रसंगी केंद्रात केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटावे लागेल. डिस्टीलरी, इथेनॉल व को-जन हे तिन्ही प्रकल्प केल्याशिवाय तो कारखाना सुरळीत होणार नाही आणि हे करण्याची धमक आमच्यातच आहे, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.