कोल्हापूर : महाराष्ट्र – कर्नाटक राज्यांना जोडणाऱ्या खिद्रापूर – जुगुळ या कृष्णा नदीवरील पुलाच्या रस्त्याच्या कामास त्वरित सुरुवात करावी. अन्यथा आठ दिवसांत ग्रामस्थांसह अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जैन मुनी उत्तम सागर महाराज यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला. कर्नाटक व महाराष्ट्र राज्याला खिद्रापूर – जुगुळ हा महत्वाचा पुल आहे. तत्कालीन खासदार प्रकाश हुक्कीरे यांनी २०१७ साली २० कोटी ८५ लाख रुपये खर्चाच्या या पुलास मंजुरी मिळवली आहे. कर्नाटक हद्दीतील रस्ते व पूल याचे बांधकाम तयार करण्यात आले आहे. या रस्त्याचे व भराव्याचे काम कर्नाटक शासन करणार आहे. हा पूल २४७ मीटर लांब व ११ मीटर रुंदीचा आहे.

भूसंपादनाचा अडसर

महाराष्ट्र हद्दीतील खिद्रापूर गावाजवळील जमीन भूसंपादन करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाला ८० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. खिद्रापूर हद्दीतील भराव व रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू करण्यात आले नाही. या भागातील शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी शेतजमीन देण्यास तयार असताना देखील त्यांची रक्कम दिली नसल्याने भूसंपादन करता आले नाही. वारंवार मागणी करूनही या भागातील खासदार, आमदार व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

हेही वाचा : महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ४० कोटी मंजूर – हसन मुश्रीफ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापुरात उपयुक्त

कृष्णा नदीकाठचा हा भाग अतिमहापुरात सापडणारा आहे. हा पूल पूर्णत्वास आल्यास महापूर काळात राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, मिरज यासह महाराष्ट्रातील अन्य गावातील लोकांना याचा उपयोग होणार आहे. तसेच कर्नाटकातील बेळगाव , कागवाड अथनी, चिकोडी शिरगुपी हा मार्ग जवळचा होणार असून पैशाची व वेळेची बचत होणार आहे. तसेच, या पुलामुळे विजापूर – कोल्हापूर हा राज्य मार्ग असा उन्नत दर्जा प्राप्त होणार आहे, असेही उत्तम सागर मुनी महाराज यांनी सांगितले.