कोल्हापूर : जयसिंगपूर येथे लक्ष्मी पूजनाच्या रात्री एका तरुणाचा खून करण्याची घटना घडली. सुनील किसान पाथरवट ( वय ३१) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गुन्ह्याचा उलगडा अवघ्या १२ तासांत करण्यात जयसिंगपूर गुन्हे शोधपथक व कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या संयुक्त पथकाला यश आले आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

या प्रकरणी पोलिसांनी प्रमुख संशयित आरोपी शेखर महादेव पाथरवट (३०), सागर परशुराम कलकुटगी (३१), विजय लक्ष्मण पाथरवट (४३) आणि संजय लक्ष्मण पाथरवट (४७) यांना अटक केली आहे.

लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मध्यरात्री प्रमुख आरोपी शेखर महादेव पाथरवट, सागर परशुराम कलकुटगी, विजय लक्ष्मण पाथरवट, संजय लक्ष्मण पाथरवट यांनी सुनील याला पूर्ववैमनस्यातून बेदम मारहाण केली. चाकुचे वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तत्पूर्वीच तो मृत्यू पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलीस तपास पथकाने वेगवान कारवाई करत गोपनीय माहितीच्या आधारे उपरोक्त जयसिंगपूर येथील रहिवासी असलेल्या चौघांना शिताफीने ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. गुन्ह्यातील उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असून, त्यांच्या अटकेसाठी पथकाने मोहीम हाती घेतली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.