कोल्हापूर : कोल्हापूरच्या पहिल्याच भेटीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्यासंदर्भात लवकरच मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांची भेट घेऊ, अशी ग्वाही दिली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील या प्रश्नाची आपल्याला माहिती असल्याने त्याबाबतचा पाठपुरावा व्यक्तीने करू असे आश्वस्त केले.

 आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने त्यांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस सोमवारी दुपारी विशेष विमानाने कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. यावेळी खंडपीठ कृती समिती व जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची विमानतळावर भेट घेऊन निवेदन दिले.

 त्यांच्याशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू होण्यासाठी बऱ्याच काळापासून संघर्ष केला जात असल्याची माहिती यापूर्वीच मिळालेली आहे. या निर्णयाचा लाभ कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षकार व वकील यांना होणार असल्याचे लक्षात घेऊन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्याशी लवकरच भेट घेऊन चर्चा करणार आहे. खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष गिरीश खडके, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य विवेक घाटगे, महादेवराव आडगुळे, प्रकाश मोरे, प्रशांत चिटणीस आदी वकील उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.