कोल्हापूर : जगातील तापमान वाढ, बदलते हवामान याचा विचार करून ऊसशेती केली पाहिजे. कमी खर्चात जास्त उसाचे उत्पादन येण्यासाठी यशदायी प्रयोगाचे अनुकरण करावे लागेल. दत्त कारखान्याच्या यशस्वी ऊस प्रयोगांचा अवलंब केल्याने शेतीमध्ये क्रांती निर्माण होईल, असे मत पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. नीळकंठ मोरे यांनी केले.
शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या वतीने ‘बदलत्या हवामानावर आधारित ऊस शेती’ बाबत शास्त्रज्ञ व शेती तज्ज्ञांची बैठक आयोजित केली होती. यावेळी डॉ. मोरे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे निवृत्त कार्यकारी संचालक डॉ मच्छिंद्र बोखारे, ऊस संशोधन केंद्र कोईमतूरचे डॉ. के. कन्नन, डॉ. महादेव स्वामी, पुणे येथील कृषी तज्ज्ञ डॉ. दशरथ थवाळ, विस्माचे कार्यकारी संचालक डॉ. अजित चौगुले, ऊस प्रजनन विभाग व्हीएसआयचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. व्ही. सुशिर, कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे प्रमुख डॉ. जयवंत जगताप, सुपर केन नर्सरीचे जनक डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अरुण मराठे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. बी. पी. पाटील, कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे डॉ. विजय नाळे यांनी मते मांडली. प्रास्ताविक गणपतराव पाटील, स्वागत कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी, आभार मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी मानले.
चर्चेचा केंद्रबिंदू
यावेळी प्रचलित खत मात्रेत आवश्यक बदल, ठिबकद्वारे खत मात्रांचे मार्गदर्शन, ड्रोनद्वारे फवारणी, ऊसपीक पक्वतेवेळी फवारणी, एकरी १५० टन ऊस उत्पादन, ऊस पिकामध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय ) आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातील अडचणी, सेंद्रिय कर्ब वाढ अशा विविध बाबींवर सखोल चर्चा झाली.
प्रारंभी सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. कृषी विद्यापीठांमध्ये झाले नाही, ते जमीन क्षारपड मुक्तीचे काम उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या जमिनीत यशस्वी करून दाखवले. हे खरोखरच उल्लेखनीय आहे. शास्त्रज्ञांच्या अशा मेळाव्यातून निश्चितच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम होईल, असा आशावादही डॉ. मोरे यांनी व्यक्त केला.
संजीवके, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा वापर, उसाचे बीज तयार करणाऱ्या नर्सरी, रोपवाटिकेसंदर्भात बीज ॲक्टचा कायदा, बियांबाबत विश्वासार्हता, उसाची जाडी वाढवण्याचे तंत्रज्ञान, रासायनिक, जैविक खतांचा वापर, जिवाणूंचा वापर, माती परीक्षणाच्या आधारावर अपेक्षित उत्पादन तसेच शेतकऱ्यांकडून होणाऱ्या चुका, त्यांच्यासमोरच्या अडचणी, प्रश्नांना आणि शंकांना बऱ्याचशा उपायोजना मिळाल्या. सर्व बाबींचा ऊहापोह करून यामधून मार्ग काढण्यासाठी कृती आराखडा लवकरच तयार करण्यात येणार आहे.
यावेळी अध्यक्ष रघुनाथ पाटील, उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, महेंद्र बागे, इंद्रजित पाटील, दरगू गावडे, सिदगोंडा पाटील, अमरसिंह यादव, शेखर पाटील, ॲडव्होकेट प्रमोद पाटील, बाळासो पाटील हालसवडे, भैयासाहेब पाटील, ज्योतिकुमार पाटील, संजय पाटील, सुरेश कांबळे, मंजूर मेस्त्री यांच्यासह सर्व संचालक, प्रदीप बनगे तसेच ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले, शरद पाटील, संतोष दुधाळे यांच्यासह शेती खात्याचे प्रमुख कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.