कोल्हापूर : अनेक वर्ष नोट चोरी करून देश, राज्याचे नुकसान करणाऱ्यांना व्होट चोरीवर बोलण्याचा अधिकार काय, अशी विचारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केली. येथे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने गटप्रमुखांचा मेळावा बुधवारी आयोजित केला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिंदे बोलत होते. काँग्रेसकडून मत चोरीचा आरोप सातत्याने होत आहे. त्याचा समाचार शिंदे यांनी घेतला. ते म्हणाले, मतदारयादी पारदर्शक असली पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. आगामी निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी मतदारयादी निर्दोष असावी याकडे लक्ष द्यावे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी चुकीचे कथन करून विरोधकांनी मते मिळवली. विधानसभा निवडणुकीला त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला. त्यांनी ११० जागा लढवल्या पण केवळ २० जागेवर यश मिळवले. आम्ही ८० जागा लढवून ६० जागांवर विजय मिळवला. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची आहे हेच स्पष्ट झाले. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचे पाप करणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवला, अशी टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, शिवसेनेच्या यशाचा खरा शिल्पकार हा गटप्रमुख, सामान्य शिवसैनिक आहे. त्यांच्या राजकीय प्रगतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील.
मेळाव्याला उदय सामंत, शंभूराज देसाई, योगेश कदम आदी मंत्री, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, रवींद्र माने, भाऊसाहेब आवळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसैनिक हाच शिवसेनेचा खरा आधार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन पुढे जाणाऱ्या शिवसैनिकाला कायम ताकद देण्यात येईल. शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत ठेवण्याचे काम शिवसैनिकांनी केले आहे. मी ही कायम शिवसैनिक म्हणूनच राहतो. शिवसेनेमध्ये कोणीही नेता नाही, मालक नाही. आहेत ते सर्व शिवसैनिकच आहेत. मी शिवसैनिक आहे. शिवसेनेसाठी मी जीवाचे रान केले. रक्ताचं पाणी केले.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही योजना आखली नाही. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे हा हेतू आहे. योजनांच्या बाबतीत सरकार हात आखडता घेणार नाही. या विधानसभा निवडणुकीत या योजनेवर टीका करणाऱ्या सावत्र भावांना लाडक्या बहिणींनी धडा शिकवला आणि महायुतीला सत्तेत आणले.
