कोल्हापूर : गावाच्या समन्वयातच खऱ्या अर्थाने बदलाची ताकद आहे. प्रत्येक गाव समृद्ध झाले, तर राज्यही समृद्ध होईल. वाढत्या शहरीकरणाच्या काळात गावांना समृद्ध करणे आवश्यक आहे. पाच कोटीचे बक्षीस देणारे देशातील एकमेव असे हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आहे, असे मत ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे यांनी येथे व्यक्त केले. कोल्हापूर येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या अध्यक्षतेखाली ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले.

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ‘कोल्हापूर येथे ऐतिहासिक कार्यशाळेचे आयोजन झाले असून, या जिल्ह्याने राज्यासह देशाला अनेक दिशादर्शक आणि मार्गदर्शक योजना दिल्या आहेत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातूनही जिल्ह्यात चांगले काम होऊन प्रत्येक गाव समृद्ध होईल, अशी अपेक्षा आहे. ५ कोटी रुपये बक्षीस देणारे हे देशातील एकमेव अभियान आहे. प्रत्येक गाव समृद्ध झाले, तर राज्यही समृद्ध होईल.’ वाढत्या शहरीकरणाच्या काळात गावांना समृद्ध करणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांची गावपातळीवर प्रभावी अंमलबजावणी केल्यास गावाचा सर्वांगीण विकास होईल, असेही ते म्हणाले.

गेल्या सहा महिन्यांत राज्यात ३० लाख घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. घरकुलांच्या अनुदानात वाढ, बांधकामासाठी मोफत वाळू, ज्यांना जागा नाही त्यांना घरकुलासाठी जागा, तसेच सौरऊर्जा प्रकल्प यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येत्या ९० दिवसांत सर्व योजनांची यशस्वी अंमलबजावणी करून गावांना समृद्ध करावे आणि कोल्हापूर जिल्ह्याने यात अग्रस्थान मिळवावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान गावासह लोकप्रतिनिधींसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक आहे. गावाच्या विकासात योगदान देताना प्रत्येकाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री आबिटकर यांनी केले. प्रारंभी जिल्हास्तरीय आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान वाचन साहित्याचे प्रकाशन, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या ‘मी विकास यात्री’ पुस्तकाचे प्रकाशन, ‘सुंदर माझे घरकुल’ स्पर्धेची घोषणा आणि ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अपर आयुक्त नितीन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह सरपंच, ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी उपस्थितांचे स्वागत केले.